प्रस्तावना
२१. नुसते उघडे बोडके टिपण देण्यापूर्वी, तत्कालीन राजकीय परिस्थितीचे स्थूल चित्र नजरेपुढे असणे जरूर आहे. अन्यथा शहाजीच्या तत्कालीन हालचालींचा सुव्यवस्थित अर्थ लक्षात येण्यास अडचण पडून मूर्तिजा, बडी साहेबीण, मीर मंजू, मलिकंबर, जाधवराव, फतेखान, महमद आदिलशाहा, चतुर साबाजी, मुरारपंत, रणदुल्लाखान, हमीदखान, खवासखान, मुस्तफाखान व शहाजी ह्या व्यक्ती एखाद्या सूत्राच्या तंत्राने रंगभूमीवर चालतात किंवा स्वैरगतीने काहीतरी बेतंत्र वर्तणूक करतात अशी विभाषा वाचकांच्या मनात उत्पन्न होईल. करता दक्षिणेतील, विशेषत: महराष्ट्रातील आणि त्यातल्या त्यात मुख्यत: निजामशाहीतील तत्कालीन राजकीय परिस्थितीचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. त्या काळी सध्याच्या प्रमाणेच महाराष्ट्रात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र व अतिक्षुद्र असे पाच वर्ण असून, मुसलमान व रानटी अनार्य असे दोन हिंदुबाह्य लोकसमूह असत. पैकी, कातकरी, कोळी, ठाकूर, भिल्ल इत्यादी संपूर्ण किंवा अर्धवट रानटी अनार्य बाह्यांना तत्कालीन राज्ययंत्राचा अर्थ कळण्याची ऐपत नसल्यामुळे, तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या अवलोकनक्षेत्रातून त्यांना वगळावे लागते. हे रानटी अनार्य लोक शिपाईगिरीही करण्याच्या लायकीचे नव्हते आणि मुत्सद्देगिरीची आकांक्षा तर त्यांच्या मनोभूमीत अंकुरित होण्याचा यत्किंचितही संभव नव्हता. रामरावणादींच्या पुरातन काळापासून तो अद्यापपर्यंत हे वनचर वनचरस्थितीत आहेत. चांभार, धेड, महार, मांग इत्यादी अतिक्षुद्र यद्यपि वनचरस्थितीतून ग्रामचरस्थितीत आलेले होते, तत्रापि शिपाईगिरी किंवा मुत्सद्देगिरी त्यांच्या स्वप्नसृष्टीतही उदय पावलेली नव्हती. गावातील गलिच्छ व काबाडकष्टाचे बिनभानगडीचे धंदे करून व चो-यामा-या करून पोटभर भाकर मिळविण्यात ह्यांची सर्व रग जिरत असल्याकारणाने राज्ययंत्राचे अवयव होण्यास त्यांना अवकाश नव्हता. व्यापार व शेतकी ही जी मनुप्रणीत वैश्यवृत्ती ही ह्या काळी दुभंग होऊन व्यापारी व शेतकरी या दोन वर्गात वाटली गेली होती. निव्वळ व्यापारधंदा व शिल्पकला करणारे जे सोनार, शिंपी, तांबट इत्यादी कारुकर्मे त्यांच्या अनेक जाति बनून ते आपापल्या धंद्यात निमग्न असून, त्यांना राज्ययंत्रात घालमेल करण्याची पिढीजाद सवय नव्हती व तसली नवीन सवय संपादन करण्याचा कलही त्यांनी अद्याप दाखविलेला नव्हता. वैश्यवृत्तीचा दुसरा भाग जो शेतकी तो वैश्यांनी सोडून दिल्यामुळे क्षुद्रांच्या हाती सर्वस्वी जाऊन, कुणबी म्हणून एक वर्ग अस्तित्वात येऊन त्या काळी शेकडो वर्षे लोटली होती. पाणिनिकालीन अनिरवसित क्षुद्र प्रागार्यकालीन नागलोक, वैश्यवर्ण व क्षत्रियवर्ण ह्या चार लोकांचे पुरातनकाळी शरीरसंबंध होऊन, महाराष्ट्रातील कुणबी ऊर्फ कुलपती हा वर्ग निर्माण झालेला होता. ह्या वर्गातील लोक कधी मोलमजुरीची क्षुद्रकर्मे करून, कधी वाणिज्यादी वैश्यकर्म करून व कधी शिपाईगिरीचे क्षात्रकर्म करून, प्राय: कृषिकर्मादी वैश्यधर्मात गढलेले असत.