प्रस्तावना

२० शक १५४१ त मालोजी युद्धात मरण पावला त्यावेळी शहाजीचे वय पंचवीस वर्षांचे असून मालोजीबरोबर शक १५२८ पासून त्याने ब-याच मुलुखगि-या पाहिल्या होत्या. मालोजीच्या मृत्यूनंतर मालोजीची सर्व जहागीर व सर्व सैन्य यांचे आधिपत्य दरबारी शिरस्त्याप्रमाणे वर्ष दीड वर्षाने शक १५४३ दुर्मतिसंवत्सरी (बृहदीश्वरशिलालेख) शहाजीस प्राप्त झाले. तेथपासून शक १५८५ पर्यंतची जी ४२ वर्षे त्यांचा इतिहास येथे कालानुक्रमाने शकवार नमूद करावयाचा आहे. ह्या इतिहासाचे मुख्य भाग चार पडतात. (१) शक १५४३ पासून शक १५५० त फतेखानाच्या कैदेपर्यंतचा पहिला भाग. ह्या सात वर्षांत मलिकंबराचा हस्तक म्हणून काही काळ व फतेखानाचा प्रतिस्पर्धी म्हणून काही काळ शहाजीचा गेला. (२) नंतर १५४८ त मलिकंबराचा मुलगा फतेखान निजामशाही कारभारी होऊन शक १५५० त कैद झाल्यापासून शक १५५८ त निजामशाहीचा अंत होईपर्यंतचा आठ वर्षांचा दुसरा भाग. ह्या अवधीत शहाजीचे प्राबल्य अतोनात वाढून त्याच्याच जोरावर निजामशाही काही वर्षे टिकून राहिली. (३) शक १५५८ त शहाजी आदिलशाही सरदार झाल्यापासून शक १५७० त त्याला अटक होईपर्यंतच्या बारा वर्षांचा तिसरा भाग. ह्या काळात शहाजीचा कर्नाटकात बस बसता बसता तो बहुतेक स्वतंत्र व मुख्त्यार असा महाराजा बनत चालला. (४) शक १५७१ पासून शक १५८५ पर्यंतच्या पंधरा वर्षांचा चौथा भाग. ह्या अवकाशात कर्नाटकात स्थिरस्थावर करून शहाजी स्वतंत्र राजाप्रमाणे बहुतेक किंवा सर्वस्वी राहू लागला व त्याचा सवाई व पराक्रमी पुत्र जो शिवाजी त्याने सह्याद्री खंडातील आनंदभुवनात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. ह्या चार भागांना शक १५१६ पासून शक १५४१ पर्यंतच्या पंचवीस वर्षांच्या पहिल्या उमेदवारीच्या भागाचा जोड दिला म्हणजे शहाजीच्या आयु:पटाचे एकंदर पाच भाग पडतात. ह्या पाच भागातील ठळक ठळक प्रसंगांचे टिपण दिले म्हणजे शहाजीच्या चरित्राचा सांगाडा जुळला. पैकी १५१६ पासून १५४१ पर्यंतच्या उमेदवारीचा त्रोटक उल्लेख मालोजीच्या कर्तबगारीच्या टिपणात आला असल्या कारणाने, १५४१ च्या पुढील चरित्राचे टिपण भागश: खाली देतो.