प्रस्तावना

१८. नावाची विचक्षणा झाल्यावर कुलाची व वंशाची विचक्षणा विचारात सहजच घ्यावी लागते. जयराम शहाजीचे आडनाव ऊर्फ कुलनाम भोसले असे देऊन, वंशनाम शिसोदिया असे देतो. तेव्हा शिवाजीच्या राज्यारोहणकाली सार्वभौ राजाला शोभेल अशी वंशावळ व कुळगोत मुद्दाम बनावट तयार केली गेली हा आक्षेप जयरामाच्या प्रत्यक्ष पुराव्यावरून लंगडा पडतो. शिवाजीच्या वेळीच नव्हे तर शहाजीच्या वेळी उत्तर हिंदुस्थानातील अनेक कवी व जयराम हा महाराष्ट्रकवी खुद्द शहाजी महाराजाच्या व पुरोहित, राजगुरू वगैरे अनेक संभावित पिढीजात मुत्सद्यांच्या पुढे भोसल्यांचा संबंध शिसोद्यांच्या वंशाशी लावतात, यावरून निर्विवाद मान्य करणे भाग पडते की, भोसले हे शिसोदिया रजपुतांच्या वंशातील होत अशी परंपरागत कहाणी शहाजी राजाच्या दरबारी सर्वसंमत होती. ही कहाणी शहाजीच्या किंवा शिवाजीच्या दरबारीच तेवढी प्रचलित होती असे नव्हे, तर उत्तरेकडील रजपुतांनाही मान्य होती. सभासदी बखरीच्या तेहतिसाव्या पृष्ठावर जयसिंगाच्या तोंडचे शब्द सभासदाने दिले आहेत ते असे, "तुम्ही शिसोदे रजपूत, आम्ही तुम्ही एकाचे एकच आहो." म्हणजे भोसल्यांचे रजपुतत्व म्हणजे क्षत्रियत्व व शिसोदियावंशत्व त्या काळी म्हणजे शहाजीच्या काळी दक्षिणेतील व उत्तरेतील विद्वानांना व रजपुतांना मान्य होते असे झाले. हा शहाजीकालीन पुरावा अकृत्रिम असल्यामुळे विश्वसनीय धरणे प्राप्त आहे. जयराम भोसल्यांच्या मूळपुरुषाचे नाव वलीपास असे देतो. हे नाव व ह्याच्यासारखेच दिलीप हे नाव एका वंशावळीत आले आहे. हर्यश्व, कृशाश्व, युवनाश्व इत्यादी अश्वान्त शब्दांच्या जोडीचा जो अवनीपाश्व शब्द त्यातील प्रारंभीचा अ चा लोप होऊन, न चा ल होऊन व श्व चा स होऊन

अवनीपाश्व = वनीपाश्व = वलीपास

असा अपभ्रंश झालेला उघड दिसत आहे. अवनीपाश्व म्हणजे पृथ्वीपर्तीत श्रेष्ठ. ह्या अवनीपाश्व ऊर्फ वलीपास राजाच्या वंशात मालोजी झाला व मालोजीपासून शहाजी झाला, असे जयराम सांगता. भोसल्यांच्या कुळाची जयरामाला ही अशी वंशावळ माहीत होती व ती त्याने शहाजीपुढे व दरबा-यांपुढे गायिली असल्यामुळे त्या सर्वांना मान्य होती असे म्हणावे लागते. तात्पर्य, शहाजीचे उपनाव भोसले, वंश शिसोदे, वर्ण क्षत्रिय ऊर्फ रजपूत, गोत्र कुशिक, मूळ पुरुष वलीपास, अशी ग्वाही शहाजी समकालीन प्रत्यक्ष साक्षीदार जो जयराम तो देतो. शिसोदे हे आडनाव मराठ्यात सध्या आहे. ह्या मूळ शिसोदे कुळातील उपकुळ भोसले. भोसले हा शब्द भोज या शब्दाला स्वार्थक ल प्रत्यय लागून जो भोजल शब्द झाला त्याचा अपभ्रंश आहे. भोजला = भोसला. भोसल असा शब्द जयराम योजितो. दोन चार हजार वर्षांपूर्वी दक्षिण पश्चिमेकडील राजांना भोज अशी संज्ञा असे. ह्या भोज नामक राजांच्या राज्याला भोज्यं म्हणून म्हणत. साम्राज्यं भोज्यं इत्यादी मंत्रात भोज्यं हा शब्द ह्याच अर्थाने योजिलेला आहे. पाणिनीच्या क्रौड्यादिगणात भोज: क्षत्रिये असा शब्द येतो. ह्या भोजसंज्ञक राजांचे जे वंशज ते भोसले या नावाने पुढे महाराष्ट्रात प्रसिद्धीस आले. हे भोज ऊर्फ भोसले उपकुळ महाराष्ट्रात वसाहतकाली आलेले आहे. याला पुरावा असा की न्हावी, महार वगैरे क्षुद्रातिक्षुद्रात भोसले हे आडनाव आढळते व ते नागपुरापासून तंजावर प्रांतापर्यंतच्या टापूत सर्व महाराष्ट्रात आढळते. शिवाजी व शहाजी ज्या भोसले उपकुळात जन्मले ते भोसले उपकुळ ऊर्फ उपनाम न्हावी, महार इत्यादी क्षुद्रातिक्षुद्रांनी स्वीकारावयाचे म्हणजे ते दोन कालातून कोणत्या तरी एका कालात स्वीकारले गेले असले पाहिजे.