Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[२६१] ।। श्री ।। १ नोव्हेंबर १७६०.
राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गो।।:
विनंति उपरि. अबदाली यमुना बागपताजवळ उतरला आणि गणोरास आला. खासा स्वारी कुंजपुरियाहून पानिपतास आली. त्याजवर तीन दिवस गणोरास होते. तेथून भालकियास आले. तेथून दोन अडीच कोस आजी आले. फार आवळून चालतात. काही लांबवू देत नाहीं. चाळीस कोस, पन्नास कोस धावतात तें नाहीं! अंतर थोडके आहे. त्याचे आमचे बातमीची गोळागोळी होती. याप्रमाणें तीन दिवस होतें. दाणा दोन अडीच शेर गिलज्याचे लष्करांत आहे. हिंमत फार आहे. तरी यास मिळणार. त्यास, लढाई लौकरीच होऊन येईल. परंतु तुह्मीं जलदीनें यमुनेपलीकडून येऊन बागपतेपर्यंत धुमामा चालवून यास रसद न पोहचे, फौजेस शह पडे, ऐसें करावें. आतां गिलज्यांचा पेंच तिकडे नाहीं. तुमच्यापाशीं सिही या पेंचामुळें लागणार नाहीं. यास्तव लांब लांब मजलीनें येणें. सुज्याअतदौलाचे मुलकांतहि जमीदारांजवळून धुंद करवणें. या कामास दिरंग न लावणें. हें काम मागेंच करावें ऐसें होतें. याउपरि तपशील न लावणें. जाणिजे. छ २२ रबिलोवल. बुंधेले वगैरे त्यास पत्रें पाठवणें. त्याचीहि खबर लिहिणें. जाणिजे. छ मजकूर. दोनचार हजार फौज सडी निवडून बागपतेजवळ यमुना पारून यावें. रसद मारावी. गडमुक्तेश्वर, शामळी, वगैरे नजीबखानाचे प्रांत जाळावे. अबदालीस मागें रसद बंद होऊन मुलुकाचा बोभाट होय असें जरूर करणें. वारंवार लिहिलें जाऊन अजून तुह्मीं उमरगडींच आहां हें अपूर्व आहे ! आतांहि लिहिलेप्रमाणें न जालें तरी मर्दुमीचें काम होत नाहींसेच जालें! ईरे धरून तडकून येऊन काम करणें. र।। छ २२ र।।लावल. हे विनंति.