Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
(७) भाऊनें दिल्लीस तळ दिल्यावर सुजाउद्दौला अबदालीला मिळाला म्हणून काशीराज म्हणतो; परंतु, भाऊ दिल्लीस येण्याच्या अगोदर सुजा अबदालीला मिळाला होता हें पांचव्या विवेचनांत दाखवून दिलें आहे. (८) कुंजपुरा घेतल्यावर भाऊ दिल्ली शहरास परत आला व तेथें दस-यास त्यानें आपल्या सैन्याची गणती केली असें काशीराज लिहितो; परंतु, कुंजपु-यास गेल्यावर भाऊ दिल्लीस कधीं आलाच नाही हें मागें दाखविलेच आहे. (९) संभाळकिया येथील लढाईत अबदाली विजयी झाला म्हणून काशीराजाचें म्हणणें आहे; परंतु, त्या लढाईत मराठे शेर झाले म्हणून कृष्ण जोशी लिहितो. (१०) गणपतराव मेहेंदळ्याच्या अगोदर गोविंदपंत वारला म्हणून काशीराज लिहितो; परंतु, ती चूक आहे हें ह्या ग्रंथातील ३२३ टिपेवरून कळून येईल. येणेंप्रमाणें काशीराजाच्या बखरींतील अग्राह्य भाग आहे. त्यानें स्वदृष्टीने जेवढें पाहिलें तेवढें बहुशः खरें आहे. बाकीचे सर्व इतर अस्सल आधार असल्यावांचून विश्वसनीय धरवत नाही.
(ब) रघुनाथयादवकृत पानिपतची बखरहि मोठ्या कसोशीनें पारखून घेतली पाहिजे. ही बखर शके १६८४ चित्रभानुनामसंवत्सरे माहे फाल्गुन शुद्ध ५ मंदवारी पुणें येथें संपविली म्हणून रघुनाथ यादव म्हणतो. परंतु फाल्गुन शुद्ध ५ मीला मंदवार नसून शुक्रवारच आहे. त्याअर्थी मित्तीवर विश्वास ठेववत नाहीं. बखरीला प्रारंभ २५ जमादिलाखरीं म्हणजे १७६३ च्या १० जानेवारीला केला म्हणून बखरीच्या प्रारंभीं लिहिलें आहे. म्हणजे ही बखर सजवावयाला ४१ दिवस लागले असें होतें. ह्या बखरीतील लढाईची तारीख चुकली आहे. भाऊ व विश्वासराव रणांत पडल्यावर मग बाळाजी बाजीराव पुण्याहून उत्तरेकडे निघाले असें रघुनाथ यादव दफात्यावरून लिहितो म्हणून म्हणतो. परंतु बाळाजी बाजीराव पानिपतच्या लढाईच्या अगोदर हिंदुस्थानास जाण्यास पुण्याहून निघाले हें निर्विवाद आहे. तेव्हां रघुनाथ यादवानें दफत्याचा नीट उपयोग केला नाहीं असें म्हणावें लागतें. माहितीपेक्षां वर्णनाने ही बखर जास्त फुलविलेलीं आहे.
(क) काहीं लहान सहान चुका गाळल्या असतां भाऊसाहेबांची कैफियत बहुतेक पूर्णपणें विश्वसनीय आहे.
(ड) ब-याच चुका गाळल्या असतां भाऊसाहेबाची बखर बहुतेक बरीच विश्वसनीय आहे. भाऊसाहेबाचा तोतया निर्माण व्हावयाच्या अगोदर म्हणजे १७६३ च्या अगोदर ही बखर लिहिली आहे. तुंगारप्रतीच्या शेवटीं १७१२ शकाच्याबद्दल १७१३ पाहिजे म्हणजे संवत्सराचें नांव, तिथि व चंद्र बरोबर होतात.