Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
[१] विस्मृतीच्या सर्वव्यापी अंधारांत ते व त्यांचीं घराणीं गुप्त होऊन जाणार नाहींत. शिवाजीराजे उदयास येण्यापूर्वी मुसुलमानांचीं सत्ता महाराष्ट्रांत निरनिराळ्या स्थली दीडशें, दोनशें व तीनशें वर्षें होती. त्या कालीं महाराष्ट्राच्या कांहीं भागांत मराठ्यांचेंहि राज्य होतें. दक्षिणेंत मुसुलमान येण्यापूर्वी जाधव, शेलार, चालुक्य, राष्ट्रकूट, आंध्रभृत्य, शालिवाहन इत्यादि राजकुलें आळीपाळीनें बारा पंधराशें वर्षें राज्य करीत होतीं; परंतु, ह्या सर्व मराठी राजांचा व पातशहांचा इतिहास त्यांच्या नांवांपलीकडे फारसा कांहींच माहीत नाहीं. त्यांचीं नांवें देखील लोपून जावयाचीं; परंतु, पुराणें, ताम्रपट व तवारिखा आहेत म्हणून तीं तरी अद्याप ऐकूं येतात. महाराष्ट्रांतील संस्थानिकांच्या व जहागिरदारांच्या पूर्वजांच्या नांवांचीहि हीच दुर्दशा होण्याची वेळ आली आहे. तेव्हां ती टाळावयाची असल्यास ह्या संस्थानिकांनीं व जहागीरदारांनीं आपापलीं दफ्तरें होईल तितकी त्वरा करून स्वतः प्रसिद्ध करावीं किंवा प्रसिद्धीकरितां इतिहासशोधकांच्या स्वाधीन करून टाकावीं.
[२] त्यांच्या पूर्वजाचें पराक्रम ऐकून त्यांच्या घराण्याविषयीं महाराष्ट्रांतील लोकसमूहास आदर व पूज्यता वाटूं लागेल. सध्यां, अमुक एका घराण्याचें पूर्वज मोठे होते ह्यापलीकडे कांहींच माहिती नसते. ह्या निर्गुण मोठेपणाचें सामान्य जनास ध्यान करितां येत नाहीं. तेव्हां हें मोठेपण सगुण व साकार झालें असतां म्हणजे ह्या मोठ्या पुरुषांनीं कोणकोणते पराक्रम केले ह्याची तारीखवार अशी भरपूर माहिती मिळाली असतां, लोकांना त्यांच्या मोठेपणाची व्यवस्थित कल्पना येईल.
[३] त्यांच्या घराण्याचा लोकांना आदर वाटूं लागला म्हणजे त्यांचें स्वभावसिद्ध धुरीणत्व सर्वत्र मान्य होईल.
[४] व आपण लोकसमुहाचे धुरीण आहों, असें ह्या संस्थानिकांना व जहागीरदारांना वाटूं लागलें म्हणजे ते, पूर्वजांच्याच नांवानें नव्हे, तर स्वतःच्या गुणांनीं लोकादरास पात्र होण्यास तयारी करूं लागतील.
हे अमूल्य फायदे ह्या दफ्तरांच्या प्रसिद्धीकरणापासून त्यांच्या मालकास होण्यासारिखे आहेत. इतर लोकांस व संपूर्ण देशास फायदे काय होतील हें सर्वत्र महशूर असल्यामुळे त्यांचें येथें संकीर्तन करीत नाहीं.