Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
प्रस्तुत ग्रंथात मल्हाररावासंबंधी पत्रव्यवहार बहुतेक मुळीच नसल्यामुळें, मल्हाररावाविरुद्ध साक्षात पुरावा कांहीच आणित येत नाही. परंतु मल्हाररावाच्या पूर्वीच्या वर्तनावरून व लेखांक २०२ तील सुजाउद्दौल्याच्या संशयावरून ह्या गृहस्थानें पानिपतच्या मोहिमेंत व युद्धांत कुचराई केली असावी असा बळकट तर्क करितां येतो. पानिपतच्या मोहिमेंत कुचराई केल्याबद्दल आणि अबदालीशी व नजीबखानाशी अंतस्थ रीतीनें व्यवहार केल्याबद्दल पहिल्या माधवरावानें मल्हाररावाचा दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड यास तोब्याखाली बडविलें होतें हे सुप्रसिद्ध आहे. ह्या आख्यायिकेवर जरी विशेष भिस्त ठेविली नाही तत्रापि मल्हाररावाच्या स्वामिभक्तीविषयी व देशभक्तीविषयीं विकल्प घेतां येतो हें निर्विवाद आहे. सुरजमलजाट दिल्लीस मराठ्यांच्या सैन्यांतून रुसून सबलगडास गेला व आपल्या मुलाला भाऊकडे पाठवून देण्याचा त्यानें विचार केला ह्या गोष्टींचा उल्लेख ह्य ग्रंथांतील पत्रांत आला आहे (लेखाक २५९, २६४, २४४, २१६, २१५). सुरजमलजाट मराठ्यांच्या विरुद्ध गेला नाही व अबदालीलाहि त्यानें मदत केली नाहीं. परंतु अबदालीच्य विरुद्धहि पण तो गेला नाहीं. गोविंदपंताच्या बरोबरीनें किंवा खालोखाल कुचराई करणारे गृहस्थ म्हटले म्हणजे गोपाळराव गणेश बर्वे व गणेश संभाजी खांडेकर हे होत. पहिले रघुनाथरावदादाचे निकट संबंधी होते. ह्यांनी अंतर्वेदींत राहून अबदालीला पायबंद देण्याचें काम केलें नाही. हे गोविंदपंतांच्या दिमतीला असल्यामुळें गोविंदपंताच्या हुकुमाप्रमाणें ह्यांना वागावें लागलें असेल हें उघड आहे. गणेश संभाजीचें पाऊल गोपाळराव गणेशाच्या थोडें पुढें होतें. त्यानें अंतर्वेदींत अबदालीला पायबंद देण्याचें काम तर केलें नाहींच; उलट बुंदेलखंडात पृथुसिंग वगैरे संस्थानिकाशीं ह्याच वेळीं भांडणतंटे उपस्थित करून सदाशिवरावाला ह्या संस्थानिकांकडून कांहीं साहाय्य करून द्यावयाचें तें देवविलें नाहीं (लेखांक २५६, २५७). गोपाळराव गणेश व गणेश संभाजी हे दोघे इसम रघुनाथरावाच्या पुठ्ठयांतील होते. ह्यांना कदाचित् सखारामबापूची शिकवणी असल्यास न कळे.
येथपर्यंत गोविंदपंतादि मंडळींच्या कृत्यांचा विचार झाला. आतां सदशिवरावभाऊच्या वर्तनांत कांहीं कमीपणा दिसतो की काय तें पाहू. १५ नोव्हेंबर १७६० पर्यंत सदाशिवरावाचें वर्तन जसें असावें तसेंच होतें. गोविंदपंत अबदालीच्या पाठीमागून येऊन त्याची रसद बंद करील ह्या आशेवर भाऊ पानिपतास तळ देऊन बसला हें रास्त होतें. परंतु १५ नोव्हेबराच्या सुमाराल गोविंदपंतावर विश्वास व भिस्त ठेवण्यांत अर्थ नाहीं हे भाऊला पक्कें कळून चुकलें होतें. यद्यपि भाऊच्या सैन्याचा जोर अबदालीपेक्षां जास्त होता, तत्रापि दाणागल्ला मिळण्याच्य दिवसेंदिवस कमी होत जाणा-या संभवामुळें सदाशिवरावभाऊनें अबदालीशी मोठ्या कडाक्याचें युद्ध मुद्दाम करून त्याचा शह टाळावयाचा हाता किंवा त्या प्रकारानें शह टळत नसल्यार त्याची फळी फोडून दिल्लीकडे निघून यावयाचें होतें. ह्यापैकीं पहिल्या मार्गाचा अवलंब भाऊनें १५ नोव्हेंबरापासून ७ डिसेंबरापर्यंत करून पाहिला.