Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[७५] श्रीदत्तात्रय. १६ सप्टेंबर १७५७.
पै॥ छ १ मोहरम शुक्रवार संध्याकाळ.
श्रीमंतसद्गुणस्वभाव राजश्री रावसाहेबाचे सेवेसी:-
आज्ञाधारक जीवनराव केशव साष्टांग नमस्कार विनंति. येथील क्षेम ता॥ छ १ मोहरम शुक्रवार प्रातःकाळ सूर्यउदये यथास्थित असे. विशेष. प्रार्थना ऐसीजे:-निजामअल्ली शहरापासून तीसा कोसांवर जाफराबादेस आला. तदनंतर बसालतजंगाचा व निजामअल्लीचा पेच मातबर पाडला. येथून थोरले नवाब सलाबतजंग याचें पत्र व बसालतजंगाचें पत्र निजामअल्लीस पाठविलें कीं येकंदर पुढें न येणें, वराडांत जाणें. भेटीचा मजकूर तरी आह्मी थोडक्या दिवसांत येऊं. भेट होईल ऐसें पत्र गेलें. निजामअल्ली येकंदर पुढें येणार नाहींत. आले तरी यास मुस्तेद करून लडावीन. निजामअल्ली मारला जाईल. महाराव आले ते भयाकरितां उगेच आहेत व मजलाहि वळखतात. गोड गोष्टी बोलतात. $दौलताबादेचे मोर्चे आज शुक्रवारी संध्याकाळ पावेतों उठवून रविवारी हाकीमम॥अल्लीखा यास घेऊन स्वामीपाशी येतों. गंगेअलीकडे कांही फौज राजश्री शिंदे सुभेदार याची आली ह्मणऊन मोगलास कळलें तरी येक राऊत गंगेअलीकडे न यावा. मजला लटकेपणा येईलसें न करावें. मोगलाच्या करारमदारात तिळभर अंतर नाहीं. मोठी गोष्ट निजामअल्लीस न येणें ह्यणोन पत्रें गेली. आला तरी पारपत्य याजकरीच करवीन. ऐसा मोठा पेच पाडिला. वेगळीं वेगळी चहूंकडे राजकारणें राखून ठेविलीं आहेत. तरी गंगेअलीकडे स्वार येक येऊं न द्यावा. पांचशें स्वार गंगा उतरोन उत्तरतीरीं आले. त्यास आज्ञा सादर व्हावी कीं पलीकडे जात. सेवक रविवारीं नवाब सलाबतजंगापासून रुसकत जाला. चार वस्त्रें व येक हत्ती रोडसा ह्मातारा इनाम या सेवकास दिल्हा. काल छ ३० जिल्हेजीं गुरुवारी नवाब बसालतजंगापासून रुसकत जाला. चार वस्त्रें व येक शिरपेच जडावाचा सामान्यसा नवाबांनीं आपल्या हातें पागोट्यावर बांधला. गंगेअलीकडे ऐक राऊत येऊं न द्यावा. निजामअल्ली मोठे बळे फिरे ऐसें केलें. माझ्या करारांत अंतर न पडे ऐसें केलें पाहिजे. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना. मोर्चे उठवितेवेळेस दौलताबादेस हा सेवक जाईल. शहानवाजखानाची भेट होईल. हे विज्ञापना.