नवाब महमदअल्लीखानानी तीन महिने महाराजाचे आस्त्रेंत असून, श्रीरंगपट्टणचे कतेर व देवराजदळवाई यांसी व दक्षिण प्रांतीचे पाळेगार समग्रांसही व हैदराबादेस ज्या सरजंगास व आर्काडपट्टीचे काळहस्ती, वेंकटगिरी, बोंमराज, वगैरे भारीपाळेगारासहीं पत्र लिहून पाठवून, तीन महिन्यानंतरें आपण त्रिचनापल्ली किल्यास जाऊन पावले; त्यादिवसांत प्रतापसिंव्ह महाराजानी आपले पुत्र तुळजामहाराजास नबाब महमदअल्लीखानराजाचा आस्त्रांत येइनाते, अगोदरीच त्याचे प्रथम लग्न मोहिते यांची लेंकीस घेऊन केले. त्या बाईसाहेबाचें नांव राजस बाइसाहेब; तदनंतरें कित्येक दिवसानंतरें महाराजाचें प्रथम स्त्री अहल्याबाईसाहेब परमपदास पावले. चौथी स्त्री येशवंत बाईसाहेबाचे उदरी दोघी कन्या जन्मल्या. पुढें त्या दोघी कन्यास लग्नाचा काळ प्राप्त जाहल्यावेळेस, येक कन्या महाडिकास व येक कन्या लिंबाळकरास देऊन लग्न जाहलें.प्रतापसिंव्ह महराजाचे राख्या सातजणापैकीं अन्नपूर्णाबाई ह्मणार राखीचे पोटीं, रामस्वामी ह्मणून येक, कृष्णस्वामी येक, ऐशे दोघे लेंक जाहलें; परंतु ते विहित मार्गेकडून नाहींत अविहितमार्गेकडून उत्पन्न जाहले, ह्मणून लोक वदंती प्रख्यात होती. त्यापैकीं धाकटे लेंक कृष्णस्वामी ह्मण्णार कित्येक दिवस वाहडून देवगतीस पावले. ज्येष्ट लेंक रामस्वामी ह्मण्णार होते त्याचे नावेंच अमरसिंव्ह ह्मणून रूडि पडली, ह्या च्यार बाबती लिहिल्या त्या येक काळीच असनांत सतत पांच वर्षे माघ पुढें असल कळावयास्तव लिहिले. तदनंतरें पलीकडील पूर्वोंत्तर लिंहितो जे, हिरासतमोहदीनखान व चंदासाहेब देखील दक्षिण प्रांत साधणेच्या हेतून निघून पुदन्नेरीचे वाटे त्रिचनापल्लील जाणारानी, प्रतापसिंव्ह महाराजास कांहीं फौजेच्याखर्चास माघून पाठविले. महाराजानी नबाब महमदअल्लीखानाचा व आमचा स्नेह विशेष जाहल्याकरित त्याच्या शत्रूस आह्मी कुमक करणें विहित धर्म नव्हे ह्मणून निराकरण केलेल्या रागाने हिरासतमोहिदिनखान व त्याच्या सेनासहमवेत चंदासाहेब तंजाउरावरी येऊन, उतरून किल्यास वेढा घातला.