तेव्हा अनवर्दिखान सांपडले जाऊन चारि घटिका पावेतो आपले तोंडाने तंजाउरचे फौजेचे लोकांस प्रतापसिंव्ह महाराजाची दुराई देउन राहातें केले इतक्यांत किल्ला समीप जाहल्या करितां महाराजास हे वर्तमान कळून महाराजानी बाक्षाई सुभेदार जाहल्याकरितां त्या अनवर्दीखानास सोडून येणें ह्मणून निरोपिल्या करितां फौज निघून आली तदनंतरें खानमजकूरानी महाराजास वस्त्रा पत्र पाठऊन महाराजा कडूनहीं आपण वस्त्र पत्र पाठऊन संविधानहीं येक्या रीतीने वारतें घेऊन अनवर्दीखानानें आर्काडास निघून गेले. त्यासंधीत येक पांढरा हत्ती आला होता. तदनंतरें पेसजी रघोजी भोंसलें व फत्तेशिंग त्रिचनापल्लीचे पारपत्यास आले होते, तेव्हां चंदासाहेबास धरून नेऊन गडावरी घातले होते ह्मणावयाचा अर्थ वरी लिहिलें आहे कीं, त्या चंदासाहेबास बलाऊन तुला सोडितों, तूं कोट पाहिजे तेथें जा, परंतू तंजाउर राज्य आमचे स्थळ जाहल्याकरितां त्याच्या वाटेस त्वां जाण गरज नाहीं, ह्मणून त्यापासून लिहिलें व प्रमाण हीं घेऊन त्या चंदासाहेबास सोडून दिल्हे. तो चंदासाहेब तेथून निघून अदरानीस हिरासमोहदीन् खानाकडें पाठऊन, त्याशी बोलुन पंचवीस हजार स्वार, व तदनुसार वार, तोपखाना, वगैरे सन्नहानिशि हीरासमोहदीनखान् चंदासाहेबासहीत दक्षिणप्रांतास स्वारीचे वेळेस फरांशिसासहीं पत्र पाठऊन, संविधान लाऊन बरोबरी त्याची कुमकही घेऊन, आर्काडसुभेदार अनवर्दीखानास मारून आर्काडास पावले. तेव्हां आर्काडांत होते ते महमद अल्लीखानानी गुप्तमार्गेकडून, नागपट्टणास पाऊन दोने तीने दिवस तेथें राहून, तेथून प्रतापसिंव्ह महाराजास कागदपत्र पाठविले. महाराजांनी त्या कागदाची नंब्रता व वेळ समयही मनास प्रार्थिले, त्यास आह्मीं आस्त्रा देणेंच विहित, पलीकडें चंदासाहेब व हिरासमोहदीनखान यांकडून आला उपद्रव येवो, पाहून घेऊं ह्मणावयाचे दृढतेनें, नबाब महमदअल्लीखानास बलावून घेऊन, आपले वाड्यामधील खासबागीमधील महालांत स्थळ करून देऊन ठेऊन घेतले,