शिवाजी राजाचे दुसरे पुत्र राजारामास पनाळ्याचे राज्य दिलें होतें। त्यांनीं देह ठेविल्यावरी त्यांचे कुलदीपक औरस पुत्र संभाजी राजे ह्मण्णार राज्य करीत होते । त्यांस संतती नाही त्यानी निवर्तवेवेळेस, आपले दाइजापैकीं येक मूल घेऊन त्यास शिवाजी राजे ह्मणून नाव ठेऊन त्यास पनाळ्याचे तक्त देऊन संभाजी राजे निवर्तले। पेसजी ते शिवाजी राजेच राज्य करीताहेत। आतां येंकोजी राजे यानी तंजाऊर साधिले । त्याचा वंश, विस्तारातें लिहितों । जे भोंसल वंशांत येकोजी राजे ह्मणून नाम पावले ते चौथे येंकोजी राजे दुसरेंदा ब्यंगळूरी राज्य करीत असतां विजापूरचे बादशाहा अल्लीयदलशाहासीं पत्रें आली, त्यांत तंजाऊरचे राजे विजयराघव नायड वगै-यानी त्रिचनापल्लीचे राजे नायडानी मोहिम करून किल्ला वेढिला आहे, ह्मणून तंजाउरचे राजानी वकीलास पाठविले। करितां खादर येकखलासखान व अब्दुल हलीयम या उभयतां वजीरास थोडी फौज देऊन पाठविलों आहे, तरी तुह्मी आपले फौजेनिशी यां बरोबरी जाऊन त्रिचनापल्लीचे नायडाची फौज मारून काहाडून तंजाउरच्यास मोकळें करून, बादशाहीं प्रेषक व त्यावरी बाकी आहे ते बाहाल फौजेचे नालबंदी मोकरोर पावली, तेहीं त्याकडून घेऊन पाठविणें ह्मणून लिहिला अर्थ मानून, राजे मजकूर ब्यंगळूरचा किल्ला व राज्यहीं कागलकर घाटे जुझाखा याचे स्वाधीन करून, उभयतां वजीराबरोबरी स्वार होऊन येते वेळेस आरणीच राज्य साधून तेथून तंजाउर प्रांतास येऊन त्रिचनापल्लीच्या नायडाचे फौज मारून काहाडून तंजाउरच्यास मोकळें करून प्रेषक षंबिनालबदीचे पैक्यास्तव, अपण तिरमलवाडींत उतरून बरोबरी आले दोघे वजीरखादर येकखलासखान व अबदुल हलीम उभयतांस पैक्यास सक्ती करण्यास्तव किल्या बाहेरच राहते करून, राजे मजकूर दुसरे पुत्र शरफोजी राजाचा जन्मकाळ नाम जाहल्याकरितां तिरुमलवाडींत राहिले होते। तेव्हां शके १५९६ राक्षस सवत्सरी वंशांतील शरफोजी राजे ह्मणून नाम पावले । त्यांते तिसरे शरफोजीराजे जन्मले।