तुमचे वडील शाहाजी राजे अमच्या अनुमतीवरी जैसें होते की तैसेंच तुह्मी असावे ह्मणून उदंड रीतीनें संविधान पाठविलें । त्यास त्या येकोंजीराजानी तजविज करून युक्त मानुन अल्लीयदल्शाची गोष्ट मानून अनुसरले । येकोजी राजे ब्यंगळूरी राज्यमार करीत असतांना तंजावूर राज्यांत राज्य करणार नायडकुटानी, तिरचनापल्लींत राज्य करणार नायडकूटासी, विगाड पडून त्रिचनापल्लीचे नायड बलवंत झाल्याकरितां त्यांकडून अपले राज्य अपहृत होईल ह्मणू १ दृढ मानून त्या त्रिचनापल्लीच्यानी तंजाउरच्या किल्यावरी युत्ध करीत असतां निर्वाह नाहीसें, विजापूरास अल्लीयदल्शाहबाक्षाईकडें हेजीबास पाठविले । त्यानें जाऊन सरदार येखलासखान व अबदलहलीम या दोघे वजीरांस अनसरून त्यांच्या गुजरानानें बाक्षायाची भेटी घेऊन आपले यजमानाचा हावालू जाणवले । तेव्हां आल्लीयदलशाहानी या सरदार येखलास व अबदलहलीमासच कुमकेस जा ह्मणाले । त्यानीं आपली फौजच पुरी नाहीं आणखी कुमक पाहिजे ह्मणाल्याकरितां येकोंजीराजे ब्यंगळूरी होते त्यांस दस्तक देऊन त्यांसहीं बरोबरी घेऊन जां ह्मणाले तैसेच ते उभयतां वजीर ब्यंगळूरास येऊन येकोंजी राजाची भेट घेऊन दस्कत दिल्हे । राजानी ते दस्कत मानून या उभतां वजीरांसी वेऊन तंजाउरचे वकीलही येकोंजीराजास कुमकेस्तव प्रार्थना केले । तेव्हां येकोंजीराजे सकळ सन्नाहानिशी कुमकेस येताना वाटेस आरणीचें राज्य साधून, वेदाजी भास्कर यास आरणीचे किल्यांत ठेऊन, तंजाउरास येऊन त्रिचनापल्लीच्यासी युत्ध करून, त्यांसी पळऊन तंजाउरच्यास मोकळीक करून, आपण ब्यंगळूरास प्रयाण होउन तिरुमल्वाडींत राहिले । तेव्हां त्यांची स्त्री दीपाबाई साहेब पूर्ण गर्भिणी समागमें होते । येकोंजीराजे तिरुमलवाडीस उतरले तेव्हां दीपाबाईसाहेबास प्रसवकाळ होऊन येकोंजीराजास द्वितीय पुत्र शक १५९६ राक्षस संवत्छरी तिसरे शरफोजीराजे जन्मले । तेव्हां येकोंजीराजास स्वप्नांत देवानी येऊन सांगितले जे तुह्मी तंजाउरचें राज्य सोडून जाऊ नका तुमचे वंशपरंपरेने हें राज्य भोगावें