Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[३७] श्री. ३ जुलै १७९५.
विनंति विज्ञापना. अलीजाह बहादूर साहेबजादे निघून गेल्यापासून शहरचा व हवेंलीचा बंदोबस्त फारच झाला आहे. घटिका दिवस बाकी राहतो तेसमयीं तोफ व्हावी. तोफ होतांच दरवाजे शहरचे बंद खडक़ी मात्र खुली प्रहर रात्रपर्यंत राहते. दरवाजापाशीं गाजज्या ठेवून पालखी स्याना गाडी, घटाटोपसुद्धां कोणाची जाऊं नये. याप्रमाणें ताकीद आहे. हवेलीचेही दरवाजे बंद करून थोरले देवडीचा मात्र एक दरवाजा खुला असतो. वाड्यांत व भोंवतें व वरील कमानींत हत्यारबंद ढाल, तरवारा, कमाना, तीर याप्रमाणें बारगिराजी चौकी नेहमीं ठेविली. रायरायां यासं रात्रंदिवंस हवेलीतच राहण्याचा हुकूम. त्याप्रमाणें नवाबाचे वाड्यांत त्याचें एक मकान आहे तेथेंच भोजन होतें. सर्वकाळ दिवाणखान्यांत हजर असतात. बफरुद्दौला व कयामन्मुलूक तीन दिवस अहोरात्र तेथेंच राहिले. मीरअल्लम भोजनसमयीं घरास जाऊन येतात. पांगावाले वगैरे सर्व सरदार खिलवतीचे दिवाणखान्यांत रात्रंदिवस हंजर, याप्रमाणें बहुत बंदोबस्त आहे. कोणा एकाचा विश्वास व इतबार पोहोंचत नाहीं समजून, असा बंदोबस्त तूर्त प्रसंगीं आहे. गोलकुंड्याचे किल्यानजीक मुसारेमूचे लोक चौकीस ठेविले आहेत. वाटसरू येणार जाणार जासूद हरकारे यांजपाशील कागदपत्र घेऊन पहावे, येथपावेतों चौकशीही होत आहे. आपले टप्यास अद्याप हरकत नाहीं. र॥ छ १५ जिल्हेज. हे | विज्ञापना.