Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४६९] श्रीरघुवीर. ७ फेब्रुवारी १७५६.
पौ माघ वद्य १० बुधवार
शके १६७७ युवानाम संवत्सरे.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित यांसी :-
सेवक मुधोजी भोसले दंडवत विनंति येथील कुशल जाणून स्वकीय आनंदलेखनें चित्त प्रमोदाप्रत करीत असिलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस जाहाले, पत्रार्थी परामृश न केला, हें वडिलपणास उचित कीं काय ? ऐसें नसावें. निरंतर आशीर्वाद पत्रीं दर्शनाचा लाभ द्यावा. साहेब यांचा काल जालियानंतर दौलतेचा प्रकार जाहाला तो परस्परें आपणास श्रवण जालाच असेल. मासपक्षानंतर कुच दरकुच राजश्री पंत प्रधान यांच्या भेटीच्या उद्देशें पुण्यास आलों. इष्टालाभाचे बोलण्यांत घरकृत्यांत द्वैतार्थ पाहोन उभयपक्षीं समजाविशीसमान वाटे दौलतेचे करून उभयतांस द्यावे आणि समाधान करावें, हा निश्चय ठहराविला. इतुक्यांत कर्नाटक प्रांतीची मसलत उपस्थित होऊन पंडित मशारनिले निघाले. मजल दरमजल कृष्णातीरास आले. तों राजश्री मुरारराव घोरपडे व दक्षण प्रांतींचें ताम्र व किरात एकत्र होऊन बळ धरिलें. यांशीं झुंजावें हा इत्यर्थ करून तदन्वयेंच सांगोन पाठविल्या उपरांतिक चालोन जाणें जरूर जाहालें. मग मजल दरमजल बागडकोटचे किल्यास येऊन, मोर्चे लाऊन किल्ला हस्तगत केला. तेथून कुच दरकुच सावणूर बंकापुरानजीक आले. अमित्रांशीं गांठ घातली. किल्याचे आसऱ्यामुळें लवकर स्ववश न होय, यास्तव शह देऊन चौगीर्द फौजा उतरल्या आहेत. शत्रूचा उपमर्द जाहाला नाहीं तों कोणताहि प्रसंग होत नाहीं. यास्तव दिवसगती जाहाली. यामुळें आह्मा उभयतांसहि फौजेसहित राहणें लागलें. अशा प्रसंगांत वो राजश्री शिवभट साठे बंगालियाहून नागपुरास आले. तिकडील ऐवजाच्या हुंडया बारा लक्ष रुपयांच्या श्री वाराणशीचे साहुकारांच्या आणिल्या आहेत. सदर्हूपैकीं दोन लक्षांच्या हुंडया शहर औरंगाबादेच्या साहुकारियांत आल्या असेत. अगदीं रुपये राजश्री जानोजी भोसले यांकडे देणार. त्यास दौलतेतील रुपया ज्याप्रमाणें विभाग होतील तदनुसार यथा विभागें समान वाटणी द्यावी. एकासच प्राप्त होईल ऐसें नाहीं. ऐशियास, आपण वडील आहेत. तरी अगदी रुपये अमानत साहुकाऱ्यांत ठेवावे. भट मशारनिलेस उत्तम प्रकारें सांगावें. केवळ दुराग्रहासच प्रवर्ततील तरी, निम्मे रुपये त्यांकडे द्यावे, निमे आमचे वाटणीचे रुपये आपणासन्निध ठेवावे. शहरचे दोन लक्षांपैकी एक लक्ष त्यांकडे देऊन, एक लक्ष आह्माकडील राजश्री लक्ष्मण जिमणाजी ढकले यांचे पदरीं घालविले पाहिजेत. बाकी अगदीं निमेचा ऐवज आपणाजवळ असे द्यावा, येविशीं शिवभट यांसही पत्र लिहिलें असे. तथापि अतिशय करतील, लटकीं पत्रें आमचे नांवाचीं दाखवितील, तरी न मानितां रुपये अडथळोन पाडावे. पुढें जैसें निवडेल तैसा निकाल पडेल. तेथील साहुकारांसही पत्रें पाठविलीं असेत. सांप्रत तीर्थरूपाचे जागा आह्मास आपण वडील आहेत. सकळविशीं भरंवसा मानोन विनंति लिहिली आहे. ध्यानास आणोन पत्रान्वयाप्रमाणें योग घडविला पाहिजे. सर्व प्रकारें आपलें, ऐसें चित्तीं पूर्णत: समजावें. रा छ ६ माहे जमादिलावल. आपण वडिल जाणोन हें पत्र लिहिलें असे. सर्व प्रकारें भरंवसा असे. बहुत काय लिहिणें. हे विनंति. लेखनसीमा.
शाहूराज प्रसादेन रघुजी सुयशोधर: ॥
तत्सूनोस्तु मुधोनाम्नश्चैषा मुद्रा विराजते ॥भद्रं॥