Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

त्यास गनीमाचें उडतें हत्यार भारी चालतां मूर्चा देऊन, भांडियाचा मार व बरखंदाजी व तिरंदाजी या मारानें आह्माकडील जमाव जागा सोडून उपराळियासी चालिलें. तों बाबूराव याजबरोबर जमाव वरचा होता त्याचें मतें मोड जाहाला. त्यामुळे त्यांहीं पळ काढिला. त्याप्रसंगी आह्मांकडीलही जमाव बहुतेक निघाला. त्याउपर बकाजीनाईक थोडे जमावांनीं उभे राहिले. तेथे युध्द बहुत तुंबळ जाहालें. ते जागाच गनीमाचे धारकरी आठ जण ठार केले. मग मोड होऊन गनीम मारून काढिला, तों आह्मांकडील जमाव होत चालला. शिद्दीसाद सारा गनीम हटी मारून काढून, किल्ल्यांत घालविला. तों श्रीपतराव श्रीस्थळी येऊन, आपले नजरेनें युध्द पाहिलें. त्याउपर जयगडींहून भांडें आलें व जमाव आला. गोवळकोटास मूर्चे देऊन जागा घ्यावा, तों राजश्री प्रतिनिधी यांही गोवळकोटास अनुसंधान लाविलें. बकाजी नाईक यांची व प्रतिनिधींच्या भेटी जाहल्या तो मजकूर प्रतिनिधींनें घातला कीं, गनीम सुलाखें करून घेतो, तुह्मांस भांडावयासी प्रयोजन नाहीं. त्याउपरी बकाजी नाईक याही बोली केली कीं, अंजनवेलीस तुह्मी जावें, तों जागा घ्या, गोवळकोट आह्मी घेतो. तें कबूल करीत ना. त्याकडील अनुसंधान चाललें. सिद्दीसादाची भेट जाहाली. त्यास, प्रतिनिधी बकाजी नाईक यांसी ह्मणत कीं, तुह्मी आह्मी गनीम घेऊं. जागा सचंतर हातीं देत नाहीं. त्यावरून पाहतां जागा आपण जेर करावा, मेहनत करून यशास पात्र ते होणार, आपणास प्राप्तांश नाहीं, हा प्रसंग जाहलियासी तेथें राहून काय कारण असे ? तशाहिमध्यें राहिल्यास, सुलाखें कार्य दिसगतीवर गेलें. आपणाकडील जमाव, हजार बाराशें माणोस जमाव जाहाला. त्यास पर्जन्याचे प्रसंगी सुवर्णदुर्गाहून सामान पुरवितां भारी दिसोन आलें. त्यावरून बकाजी नाईक यासी जमावानिशीं जंजिरा आणविलें. त्यामागें शिद्दीसादानें प्रतिनिधीकडील जमावांशी एक दोन युध्दें तुंबळच दिली. त्यांचे वस्तु कार्यसिध्दी होतां दिसत नाहीं. विना आमच्याकडील जमाव सामील असल्याखेरीज कार्य होत नाहीं. पुढें प्रसंग होईल त्याप्रमाणें वर्तणूक केली जाईल. सविस्तर वर्तमान विदित व्हावें ह्मणोन तपशिलें सेवेसी लिहिलें असे. कुलाबाहून कागद लाखोटे आले ते सेवेसी पाठविले आहेत. त्यांवरून कुलाबाकडील वृत्त विदित होईल. बहुत लिहिणें तर स्वामी सर्वज्ञ आहेत. लोभाची वृध्दि करावी. हे विज्ञापना.