याखेरीज रेणुसा याचे मुळे कोण्ही पुरऊन दिल्हे तरी आपण वतनाखेरिज होईन ऐसी तकरीर लेहून दिल्ही. शके १६६३ दुर्मतीनाम संवछरे भाद्रपद सुध शष्टी तेरीख ५ माहे रजब ते दिवसीं लेहून दिल्हे. त्यासी तीन कागद करीन्याचे केले. एक कागद खंडोपंतीं आपल्याजवळ ठेविला. एक कागद देशपांडे याणीं ठेविला. एक कागद आह्माजवळ दिल्हा. त्याउपर भिकाजी रेणुसा यास वर्तमान करिन्याबाब सांगितले. त्याजवरी बापास जड बहुतच जाला. काही केल्या उतार नाही. मग सीतजर हगवणची वेथा कठीण जाली. तेणेकरून भाद्रपद वद्य चतुर्दसीस शके १६६३ मधी देवआज्ञा जाली. मग आपल्यास धास्त निर्माण जाली. तेणेकरून मौजे पाबे येथून जावयासि सिधांत केला. तो घरामधे वेथा पोटदुखीयाची निर्माण जाली. देवधर्म करितां काही ठिकाण लागले नाही. मग दुखणाईत देऊन धानेबास नांदावयास गेलो. तेथे राजश्री सुभेदार प्रांत मावळे हे मुलुकाचे खंडणी करावयासी आले. ते समई तर्फ मजकूरचे खोत पाटील व किलाचे लोक सरदार होते. तेव्हा त्याणी दुखणिंयाची अवस्था पाहिली व ऐकिली. राजश्री सुभेदार याणीं आज्ञा केली की, देशमुखाच्या घरामधें वेथा कठिण जाली आहे; तरी तुह्मी माहालकरी व किल्याचे लोक सरदार ऐसे दे श द दे व श्री ग वे स मे ल कुबलजाईस जाऊन बलकटी करणे. ऐसी आज्ञा केली. त्याजवरून श्रीस जाऊन समस्त लोक व राजश्री खंडोपंत व देशपांडे व माहालचे खोत पाटील ऐसे जाऊन देवाच्या नव्या मूर्ति आणिल्या होत्या, त्याची स्वस्थापना ब्राह्मण जोसी ऐसे नेऊन पुजा केली. तेसमई देवास पुसिले. श्रीनें सांगितले की, हे गोष्टी वेथेची काय सांगावी ? त्यास सांगितल्याने खरे वाटत नाही. तेव्हा कुल सार्‍यानीं अर्ज केला, गुणास आले तरी आणावा नाहीतरी वाट दाखवावी. याची वेथेमुळे खराबी बहुत जाली. तेसमई श्रीनें सांगितले की रेणुसा याची समजावीस जालियावाचून वेथेस उतार पडत नाही. तेव्हा भिकाजी रेणुसा व महादजी रेणुसा व बावाजी रेणुसा हे ह्मणू लागले की, आह्मी आपल्या पोटापाण्यिाची बोली करितो; त्यासि देवानीं अघटित सांगितले. हा भोग दुसरा आमचे पाठीं लागला. ऐसे बोलिले. मग आह्मी त्यासी बोलिलो की, तुमचा पदर काही धरिला नाही, अगर गुणास आला नाही. तुह्मी श्रमी व्हावे ऐसे नाही. तुह्मास आह्मासी जीत झगड भांडण करावयाचे ते करणे. मग तेथून येऊन आपल्या वडिलाच्या वेळेचा वाडा बांधावयासि मुहूर्त केला. त्यासी भिंती चहू बाजूच्या पर परूस घातल्या. जो जो घालितो तो पडत, ऐसा विचार जाहला. याउपरी आपण मौजे अत्रोली येथे श्रीची चोदास जाऊन पाटील बसऊन देवास विचारिले. तेथे देवानें सांगितले की ही लाग रेणुसा याची आहे. तो सिवाजी गंगाधर खासनीस व संभाजी पाटील निह्मणे मौजे विझर त्यांसी हे वर्तमान सांगितले.