लेखांक ४
श्री.
''करीना बाबाजी जुंझारराव मरळ देशमुख त॥ कानदखोरे करीना ऐसाजे :- भिकाजी बीन भिवजी रेणुसा पाटील मोजे पाबे त॥ म॥र याचा बालोजी रेणुसा मौजे मजकुरचे गाव जत्रेचे फळे व रानसावजाचे फळे व दिवा व भागसी देत होता. त्यावरी बालोजी रेणुसा याने बळेंच जत्रेचे फळे व रानसावजाचे फळे ऐसे खाऊ लागला. त्याउपरी आपले आजे राजश्री कान्होजी बावा जुंझारराव राजश्री कारकीर्द नारो माधव किले राजगडचे मुकामीं होते. तेथे बाळोजी रेणुसा नेऊन इनसाफ पाहिला. तेव्हा तेथें बाळोजी रेणुसा याजकडे इनसाफ लाऊन गुन्हेगारी खंड रुपये घेतले रु॥ ३५ पस्तीस घेतले. गावजत्रेचे फळे व रानसाबजाचे फळे देखील डुकराचे सालाबाद चालत आले आहे, त्याप्रमाणें चालवणे ह्मणून खोटा केला, आणि रुपये घेतले. आणि बाळोजीस रजा फर्माविली की, देशमुखाची फळी मागे तीन वरसे खादली, त्याची समजावीस करणे. त्याउप्रातिक समजावीस केली नाही. त्याउपरी भोगवटा आपल्याकडे पडावा, तो राजक्रांत जाला. मग माहाल मुलूक देशदेशावरी गेला. तेथून आलियावरी आपल्यावर शामलाचा खंड पडिला. व आपल्या मातुश्री यास देवआज्ञा जाल्या. व मुलेमाणसे मेली. व कर्जवाम वडिलाचे वेळचे होते, ते कर्जदार येऊन उभे राहिले. त्याकरितां वृत्तीच्या बाबें व हकलाजिम्याच्या बाबें काही तीर्थरूप राजश्री नारायणजीबावास सुचले नाही. तेणेकरून भोगवटा राहिला. मग आह्मी खंड वारिला व कर्जवामहि वारिलें व तीर्थरूपाची दोन च्यार लग्नं व बहिणीयांचे सातं लग्नं जालीं. त्याउपरी दोन च्यार वरसं स्वस्त जाले. मग रेणुसा यास फलकुटियां विसीं जाजाऊ लागलो. मग त्याणीं फिरोन जाब दिल्हा की, आपण दाहापाच वरसं खात आलो त्याप्रमाणे पुढंहि खाऊ. त्यासी तुह्मी कोणा आधारावरी खाता ? ते गोस्टीचा कागदपत्र व दाखला दुखला असेल तो दाखवणे, मग तुह्मी सुखे खाणे. नाहीतरी तुह्मास गरज नाही. मागे तीन वरसं खादले त्याची समजावीस काय केली ? पुढे तू खातोसी त्याचे खरेदीपत्र काय असेल ते दाखवणे. मग तू सुखें खाणे. नाहीतरी तुह्मास गरज नाही. ऐसी दोन चार वरसं बोली पडली. तो राजश्री पंतसचिव याणी कामथपटी मुठेखोरे व मोसेखोरे या दोही माहाली घातली. त्या उप्रांतिक कामथपटी आपले महालीं बैसली. तेव्हा राजश्री खंडोपंतीं आह्मास पटी करावयासी मोजे धानेबचे मुकामीं बोलाविले. तेथे बोली घातली की, कामथपटी दर माहाली वसूल जाली. आह्मास काही सुटत नाही. तरी माहालाची पटी करून घेणे. दर इसाफत खासगत गाव इनाम पाबे व धानब येथे कामथ पूर्वापार आपण खात आलो आहो त्याची वाट काय ? तेव्हा खंडोपंत बोलिले जे, कामथ ह्मणिजे पाटिलाचे पाटिलास देणे. ऐसे उतर निरोत्तर होऊ लागले. परंतु आह्मास निकालस होऊन गोष्टी सांगितली नाही. ते समई आपलेस भास निर्माण जाली.
पूर्वी चालत आले आहे आणि हे दिवाणदारीनें मोडितात, तेव्हा काही खासनीस व गाव कुलकर्णी ह्मणून अर्थ आणावा तो न आणिला. रेणुसी याची व आमची कटकट लाऊन दिल्ही. त्याउपरी रेणुशाचा व आमचा कजिया करारच मांडिला. मागती खंडोपंतास जाऊन पुसिले की, याचा आमचा कजिया लावावा ऐसा नाही. ते गोष्टी मान्य केली नाही. मग राजश्री दाजीपंत व राजश्री सुभेदार नसरापूरचे मुकामी होते, तेथे तीर्थरूप बावा व आपण गेलो. मग सर्व वर्तनामन विदित केले. त्यावरून राजश्री दामाजी कासी व राजश्री रंगोपंत ऐसे त्याणीं खंडोपंतास सांगितले कीं तुह्मी खासनीस आहां, देशमुखाचे सर्वप्रकारे चालवावे. ऐसी आज्ञा केली. मग फिरोन आह्मी पुसिले की, आमची वाट काय ? त्यासी त्याणीं सांगितले की खंडोपंतास हे देशमुख व तुह्मी खासनीस ऐसे आहा. यास हिरवे अगर भाजले खाणे. सर्व धंदा तुमचा आहे. त्यावरून कामथाच्या पैकीयाचा निकाल पुसिला की, हे रुपये कोण्ही घ्यावे ? त्यासी त्याणीं सांगितले की रुपये तुह्मी घेणे. कामथ तुमचे पुरातन आहेत तैसेच तुमच आहेत. त्यावरून कामथाचे रुपये दोही गावीच्या आपण दिल्हे आणि खंडोपंतापासून हुजती आणि कामथाचे कागद घेतले. तेथे लिहिले की हुजूरच्या सनदा आणून देऊ सबब गाव इनाम. यास्तव तुमचे कामथ तुह्माकडे व पुरातनहि खात आला आहा. ऐसे आह्मास लिहून दिल्हे असतां, मागती सनदा न देता, रेणुसा यासी बीर दिल्हा. त्याजवरून कर्कशा जाहाला. त्याउपरी सदरहू फलकुटीयाचा कजिया व कामथाचा कजिया एकच जाहाला. तेव्हा गाव जमा करूं लागले. ते समई त्यासी आपले माणूस पाठऊन दिल्हे की जत्रेचे फळे तुह्मी न घेणे, आमचे आह्माकडे पाठविणे, ऐसे दोन चार वेळा पूर्वी सांगितले. परंतु ते गोष्टी तुह्मी नाइकली. तरी हाली जत्रा करिता हे देणे. त्यावरून त्याणीं टाकला जाब दिल्हा की आपण देत नाही. त्याजवरून आपण दोही दिल्ही. समाकुल पांढर होती. तेव्हा त्याणीं चित्तात बोली आणिली की, आमच्या फलियास दोही दिल्ही, तेव्हा जत्रेविणे गरज आह्मास काय आहे ? ऐसी बोली बोलून बकरें मारिले होते ते तैसेच कातडीयात फले देखील बांधोन देवलास टांगिले. निवेदास मांस थोडे राहिले ते तेसैच चुलीवरी राहिले. त्याउपरी देवलीहून उठोन गेले. मग गावकरी राहिले. त्यांतून जाखोजी घीघा व बहीरजी चेरे हे आह्माकडे आले. त्याणी सर्व वर्तमान सांगितले. त्यास आपण त्याना सांगितले की देवास निवेद घातला आहे तो देवास दाखवणे, आणि बाल गोपाळ आहेत त्यासी प्रसाद देणे. जत्रेस दोही दुहवी केली नाही. फळकुटियास दोही दिल्ही. त्यावर त्याणी देवदेव केला. मग ते मांस व फळकुटे तैसेच तीन दिवस राहिले. मग रामाजी आपाजी देशपांडे याजकडे माणूस पाठविले. ते येऊन आपले नजरेनें पाहिले. तेव्हा त्याणीं शब्द लावावयाचा तो लाविला. मग आह्मी येऊन बोलिले जे, श्रीच्या देवळामध्यें घाण उठिली आहे, तिचा हुकूम काढावयाचा करणे. ऐसे बोलिले. त्यास ते दिवसीं तीर्थरूप बावास सीतजर हागवण प्राप्त जाली. तेधवा त्याणीं हे बोली घातली की, आह्मी काही जत्रेस दोही दुर्हाई दिल्ही नाही. तुह्मी बोली करिता हे अपूर्व वाटत आहे. त्याणें लबाडी करू नये आणि केली तरी हे वेळेस देवळातून घाण काढावी. देवळांत काही जावत नाही.