त्याचा हिसेबु पाहाता गाव हस्तगत होईल. त्याचा मजहर अगर खरिदपत्र जाले नाही. तेथून तुळबाजी मरळ व जिवाजी मरळ एका दो वरसामधें कटकट करू लागला. मागे आपल्या वडिलाचे व त्याच्या वडिलाची कटकट जाली नाही. हाली खंडो मल्हार यानीं येक दोन वेळा मध्येस्त घातले की, यास ब्राह्मणघरचा हाक द्यावा. ऐसे नाइकिले. ह्मणून खंडो मल्हार खासनीस यास अभिमान येऊन पडिला की, आमची गोष्ट अमान्य करितात; ह्मणून दूर दराज लाऊन ज्यानगिरी केली. हे गोष्ट खरी आहे. पूर्वापार आहे ऐसे असोन, ये गोष्टींत अभिमान खंडोपंतीं धरून, जिवाजी मरळ उभा करून, त्यास पत्र सचिवपंताचे आणून दिल्हे. त्याउपर जिवाजी मरळ हुजूर केला. तेथे जाऊन आह्मास मसाला घातला. त्याउपर आह्मी वरातदारास न भेटलो. आपल्या चितात वाद्या खरा करून उठविला. हे खरेसें दिसोन आले. मग त्यानीं आमचा प्रयत्‍न करून आह्मास बोलाविले. त्यास आह्मास सांगितले कीं, जिवाजी सातारा जाऊन हजार दोनसे रुपये खर्च केला. तो उगाच गोतांत येत नाही. तो गोतांत आलिया उपर तुमचा उपाय आहे. ऐसे ह्मणोन आह्मापासून पाच सातसे रुपये घेऊन गेले. मग जिवाजी मरळ घेऊन आले. बाजीराव पासलकर मोसेखोरे व कर्यात मावळचे देशमुख देशपांडिये यासी आज्ञापत्र आणिले. त्याउपर जिवाजी मरळ याजवह कर्यातमावळची सनद देऊन आह्मास मोसाखोराची सनद देऊन रवाना केले. त्यास आह्मी व त्यानें सनदा नेऊन लाविल्याउपर गोत मेळऊन इनसाफ करावा, तों चैत्रमासी राजश्री पंतसचिव नेराचे मोकामास मोछाव करावयासी आले. तेथे देसमुख माहालो माहालचे अवघे व्होते. तेथे आह्मापासून व त्याजपासून कागद कतबे व जामीन अमीन घेऊन बारा मावळच्या देसमुखानीं आधार उभयतांचा पाहात ऐसे असोन, कोणे गोष्टीचा जिवाजी मरळाचा ठिकाण लागला नाही. गोतानें खोटा केला. त्याउपर मागती चढी देऊन इनसाफ राहाविला.''