मग बावास पुसिले हे काय वर्तमान ? तेव्हा ते बोलिले की हे आह्मास ठाऊक नाही. त्याउपर स (न) दा ब्राह्मण घरच्या आणून ठेविल्या. त्या काही आपण आज तागाईत पाहिल्या नाहीत. त्यास तुळबाजी मरळ एक दोन वेळ आह्मास निराळया वाटेनें विचारू लागला की बाह्मणघर दिवाणातून करून घेतले, तर तुह्मी तेथील हाक होईल तो मला माझे सेतचा सोडा. ह्मणोन बोलू लागला. त्यास आपण जाब दिल्हा की आपण लेकरू, त्यास लेकरू वडिलास विचारून सांगू. मग आपण काही वडिलास विचारिले नाही. दोन चार महिने जाले; मागती पुसो लागले. त्यास आह्मी त्यास सांगितले की बावा जे दिवसी समाधानांत असतील ते समई सांगू. ऐसे करिता करिता वरसे दोन वरसे जाली. त्याउपर मागती आह्मास विचारू लागले की, खंडीभर भात माझे पुत्र जिवाजी मरळ व सिदोजी व माहादजी हे तुझी पाठी राखतील, तर तू एवढे करून आह्मास हाक सोडा, आणि आपण पुत्रास सांगून खंडीभर साली देवित जाईन. तेव्हा आपल्या चित्तांत आले की, एक दोन वडिलापासून इनामे व गाऊ करून घेतले, आणि पुढे कोठवर द्यावे, ऐसे आले. मग त्यास सांगितले की, हे गोष्ट कार्याची नाही. आमचे पदरीं उरले काय ? त्यांतून द्यावे काय ? भाऊपणीयाखाले आणि गाव तुटोन गेले, ऐसे सांगितले. परंतु गोष्ट त्याच्या चित्तांत आली नाही. मग आह्मासी क्रिया करून बोलू लागले की, तुझी आमची कटकट नाही; परंतु एवढे देणे तुह्मी ह्मणून द्या. ऐसी क्रिया धरून मागो लागले. माझे व तुझ्या वडिलाचे क्रियाप्रमाणे चालिले, त्याप्रमाणे पुढेहि चालेल. आह्मी तुह्मासी वाईट नाही. तुझे वाईट केलियाने आमचे बरें नाही. ऐसे एक दोन वेळा जे जे जागा क्रिया केली, त्यास साक्ष परमेश्वर आहे. त्याउपरातिक आपल्या चित्तांत आले कीं, दाढीस धरून पोटांत डोई घालून आंतडी काढितो. ऐसे भास निर्माण जाली. मग आपण तीर्थरूप राजश्री नारायणजीबावास विचारिले, हे गोष्ट तुळबाजी ह्मणतो. ये गोष्टीचा विचार काय ? मग त्यानी आह्मास जाब दिल्हा की, याने आह्मासी क्रिया केली ती याने सोडिली. आह्मास गोष्ट हे पुरवत नाही. तेव्हा त्यास विचारिले की, मौजे लासीरगाऊ दिधला आहे याचा अर्थ काय ? तेव्हा त्यानीं सांगितले की कोकणांत बावा गेले ते समई दोनसे रुपये घेऊन गाव दिल्हा. तेव्हा त्यास मागती विचारिले की, शामळाने धरून नेले ह्मणून तेचा रकमेचा गाऊ देऊन कबिला सोडविला; ऐसे असता दोशा रुपयास गाव दिल्हा.