क्रिया केली तिचे विप्रयास दाखविले नाही. त्यास जे गाव २ दिल्हे ते व दापोडीचा इनाम ऐसे खाऊन सुखे होते. तेथे कोणे गोष्टीची इसकिल नव्हती. भोग भोगवटा त्याचा त्याजकडे चालत आहे. आपणहि त्यासी व आपल्या वडिलाहीं त्यासी काही विक्षोप केला नाही. सलामत चालिले ऐसे असोन आपणापासून अंतर पडले नाही. त्यासी महाराज शाहू छत्रपतिस्वामीनीं राजश्री फत्तेसिंगबाबा भोसले व राजश्री बाजीरावपंत प्रधन यांची मोहीम दंडाराजपुरीकडे केली. त्याबराबर किलों किलाचे लोक व सरदार रवाना केले. त्यास किले प्रचंडगड येथील लोक व खंडोमल्हार नामजाद हे ऐसे राजश्री आनंदराव बहिरव यांबराबर राजश्री सचीवपंत यांनी देऊन रवानगी केली. तेसमई खंडो मल्हार खासनीस किला अंमल करीत होते. त्यासी तुळबाजी मरळ याने अनुसंदान लाविलें कीं, आपल्यास चाकरीचुकरीचा कसाला पडतो, तर तुह्मी आनंदराव बहिरव यासी बोली करून आह्मास इनाम होये ऐसे केले पाहिजे. मग या गोष्टीच्या विचारणांत पडोन रदबदल करू लागले. ते गोष्ट काही आपणास विदित नाही. शामळ मोडून हस्तगत राज्य जाले. मग रागडास माहाराजाचें निशाण गेलें. तेसमई मागती फिरोन सिदी सात हाफसी बळाऊन रायगडास वेडा घातला. त्याउपर माहाराजानीं अवकाट फौजास हुकूम केला. मग सहवर्तमान लस्करें उतरोन कोकण प्रांते जाऊन रायगडाचा वेढा मारून काढिला. पाचाडचा कोट राजश्री सचीवपंत याकडे जाला. तेथे राजश्री आनंदराव बहिरव लोक व सरदार घेऊन बंदोबस्तीस राहिले. ते प्रसंगीं किले प्रचंडगडचे लोक व सरदार व तुळबाजी मरळ याचे लोक ऐसे व खंडो मल्हार नामजाद ऐसे होते. त्याउपर मागती बोली घातली की, आपण पूर्वी अर्ज केला तो सिध्दीस न्यावा. त्यावरून खंडो मल्हार यांनी अगत्य धरून अडचा खंडी रकमेचा गाव करून दिल्हा. मग हे वर्तमान आपणास कळलें. कांहीं उपाय नाहीं. आपले खासनीस खंडो मल्हार यानी ये गोष्टीचा पशेत करावा तो न केला. आपल्यास कोण्ही पुसले नाही. ऐसी वर्तमान परस्परे कळो आलें. मग तीर्थरूप नारायणजीबावा यासी विचारिले की, हे गोष्ट आपण ऐकिली की ? गाव तुळबाजी मरळ करून घेतो हे गोष्टीचा विचार काय ? तेव्हा आपल्यास बोलिले की लबाड गोष्ट. तेव्हा आपण त्यास फिरोन जाब दिल्हा की, तुळ (बाजी) आह्मासी माव करितो. त्यास ते बोलिले जे माव करीत नाही. तर ये गोष्टीचा विचार काय ? तेव्हा त्यानी सांगितले की, किल्याखाली घेर्‍यांत गावचे रान पडले आहे ते घेतो. तेव्हा त्याणी आह्मास पुसिले की तुमच्या विचारे काय ? तेव्हा आपण बोलिलो जे, घेर्‍यामधे राण पडले ते दिवाणांत गेले. ते आपल्यास सोडवावयास अवकात नाही. कोण्ही एक मरळ उभा राहोन दिवाणातून सोडऊन घेतले तर ते आपलेच आहे. ऐसी बोली तीर्थरूपासी जाली. ऐसे असता घेराचें राण न घेतां, खासा गाव आपला होता तो घेतला.