लेखांक ३०.
श्रीमत् परमहंस श्रीस्वामीचे सेवेसी-
चरणरज बाजीराऊ बल्लाळ प्रधान नमस्कार विनंति उपरी. स्वामींनी पत्र पाठविले ते पावले. गोपाळपूरचे वस्तीविशी आळंदीकर बोलाविले. त्यास, प्रस्तुत तो प्रसंग राहू द्यावा. राजश्री जानोजीराऊ निंबाळकर यांजकडील नारोपंतास निरोप द्यावा म्हणून लिहिले. तरी आपले आज्ञेप्रमाणे प्रसंग राहिला असे व नारोपंत यासही निरोप दिला असे. कळले पाहिजे. सेवेसी श्रु|| होय. हे विज्ञापना.
येथून हस्ताक्षर बाजीरावाचे.
लेखांक ३१.
श्री.
श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान बाजीराव बल्लाळ प्रधान.
१६५५ आषाढ शुध्द १. आज्ञापत्र समस्त राजश्री बाजीराऊ पंडित प्रधान त|| मोकदम मौजे केळगाऊ ता चाकण प्र|| जुन्नर सु|| अर्बा सलासीन मया व अलफ मौजेमजकूर बाबतीचा मोकासा श्रीपांडुरंगाश्रम परमहंस वास्तव्य क्षेत्र आळंदी यांसि दिल्हा आहे. तरी तुम्ही परमहंस स्वामीकडे रुजू होऊन मौजे मजकुरच्या आकाराप्रमाणे बाबतीचा ऐवज वसूल यांजकडे सुरळीत देणे. सालदरसाल बाबतीचा वसूल स्वामीकडे देत जाणे. नवीन पत्राचा उजूर न करणे. छ २९ मोहरम. आज्ञाप्रमाण.
(लेखनसीमा)