लेखांक २१
श्री.
१६७२ माघ शु. ७ अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य-राजश्री लक्ष्मण शंकर गोसावी यासी-

सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार. सु|| इहिद्दे खमसैन मया व अलफ. राजश्री कृष्णराव महादेव यांसी कालपी प्रांती यमुनातीरी गंगेस जावयास समीप ऐसा गांव, हजार रुपये वसुली, तनखा तीन हजार रुपये, यांस देणे, म्हणून पेशजी पत्र दिल्हे असतां, तीन वर्षे जाहली, अद्याप गांव नेमून दिल्हा नाही, म्हणोन कळो आले. तरी, पेशजीचे सनदेप्रमाणे हजार रुपये व तनखा तीन हजार रुपये ऐसा गाव नेमून देणे. कालपीमध्ये यांणी बाग केला आहे, त्यास कोण्हेविसी उपसर्ग न लावणे व दोन चावर सेत यांणी कालपीस केले आहे व कुरण यांनी राखिले आहे, त्यास वसुलाचा व कोण्हेविसी उपसर्ग लागो न देणे. जाणिजे. छ ५ राबल. पेशजीचे सनदेप्रे क्षेपनिक्षेप हा गांवचा हवाला करणे. फिरून उजूर न करणे. जाणिजे.
लेखनसीमा.


लेखांक २२.
श्री.
१६७८ मार्गशीर्ष वद्य २. अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य-राजश्री मेघःश्याम बापूजी व गोपाळ बापूजी गोसावी यांसी-

सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु|| सबा खमसैन मया व अलफ. राजश्री रामचंद्र कृष्णराव यांजकडे गांव इनाम, प|| कालपीपैकी पेसजीपासोन आहेत. त्याचा ऐवज दुसाला मारनिल्हेस पावला नाही, म्हणून विदित जाले. त्यावरून पत्र सादर केले असे. तरी, इनामगाव पामजकुरी मारनिल्हेचे असतील, त्यांचा ऐवज काय जो दुसाला राहिला असेल तो वाजवी पेसजीचे सनदेबरहुकूम कराराप्रमाणे मशारनिल्हेस पावणे. जाणिजे. छ १५ रावल.