लेखांक २०
श्रीवरद.
श्रीमंत राजश्री कृष्णरावजी स्वामीचे सेवेसी-

पोष्य श्यामजी गोविंद साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल त|| ज्येष्ठ शुध्द १२ बुधवारपर्यंत शहरी यथास्थित जाणून स्वप्रिय लेखन करावे. यानंतर स्वामींनी सेटी खिजमतगार याबराबर पत्रे पाठविली ती पावोन सविस्तर कळो आले. इकडील राजकी वृत्त तर- नवाबसाहेब हैदराबादेस दाखल जाहाले. छावणी तेथे मुक्रर जाली. तमाम मनसबदार मुत्सद्दी आपलाले स्थळास रुकसत बरसातीबद्दल गेले. सैदलस्करखान यास आज्ञा अजनव्याचे सराईस जावयाची जाली. त्यावरून येथून कूच करून सराईस गेले. अबदुल हसनखान यांनी तपसिलवार ज्या कार्यास आले आहेत ते वृत्त लिहिले असेल त्याचवरून विदित होईल. राजश्री यजमान स्वामींकडील वर्तमान तर- उज्जनीनजीक आलियाची पत्रे आपली आली. यादगार खान करारमदार करून महादेवभटास समागमे घेऊन दिल्लीस गेले आहेत. त्याचे जाबाची वाट पाहात आहेत. कार्य होऊन आले, परवाने आले, तर छावणी उज्जेनी प्रांती होईल. नाही तर, कुच दरकुच या प्रांतास येतील. ऐसे आहे. राजश्री रावजीचे पत्र पंतांस आले ते त्याकडे पाठविले. त्याची नक्कल करून सेवेसी पाठविली आहे. पावोन अर्थ विदित होईल. या पत्राउपरांतिक दुसरे पत्र आले तेथेही हेच वर्तमान आहे. कळले पाहिजे. र|| आनंदराऊ पवार यांसी अपकारणे देवाज्ञा जाहाली, म्हणून वर्तमान आहे. बहुत काय लिहिणेॽ हे विनंति.