लेखांक १८.
श्री.
१६६२ वैशाख शु|| १. तीर्थस्वरूप मातुश्री सिऊबाई मामी वडिलांचे सेवेसी –

अपत्यसमान बाजीराऊ बल्लाळ प्रधान सां नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत गेले पाहिजे. विशेष. तुम्हापासून कर्ज घेतले मुद्दल गु नारोराम रुपये ३००० तीन हजार, पैकी वजा बहुडा तांब्याचे २ दोन व शिशाचा एक एकूण तीन रुपये ता संतोजी सिंदे लोहगडकरी बाकी रुपये २९९७ दोन हजार नवशे सत्याण्णव घेतले असेत. यास व्याज दरमाहे दरसे || रुपये दोनप्रमाणे करार केले असे. जाले मुदतीचे व्याज व मुद्दल हिशेब करून देऊ. मिति वैशाख शुध्द प्रतिपदा शके १६६२ रौद्रनाम संवत्सरे, सु|| अर्बैन मया व अलफ. *   बहुत काय लिहिणेॽ हे विनंति. सदरहू ऐवज निकडीचे समई मेळवून पाठविला, बहुत समाधान पावलो. तुम्ही कार्याचे समई चुकाल, हे सर्वथा होणे नाही. तुम्हांस उचितच आहे. हे विनंति.

लेखांक १९.
अलीफ.
आजी कृष्णराऊजी दाममोहबतहू-

अयालत व उबाहतपनाह येअतजाहदोस्तां बादजदुवा व शौकमकसूद आंकी-
दोस्तीनामा पोहचोन खुशबख्ती जाली. शादीमुबारक हो सबकतशार हरिसिंग यांब|| कपडे खलअत बमोजीब याददस्त अलाहिदे पाठविले असेत. अजराह दोस्ती कबूल करणे. मुबादक हो. दराज काय लिहिणेॽ मुस्ताक जाणिजे. हे किताबती.