पुढे वर्षा दो वर्षी, रखमाबाईस विनंति करून, मूल शहाणा होण्याकरितां ठाणे नारोडी येथे वर्ष मूल ठेवावा, मी तिथे राहून, संस्थानचा सर्व कारभार मुलाकवी करून, शहाणा कर्तो, असे म्हणोन निलकंठराव यास ठाण्यांत घेऊन गेले. चवदा महिने राहिले. मुलगा शहाणा केला. ज्ञानप्रकाश बुध्दि तुरंग पाक करून माशापासून चार तोळेपर्यंत यजमानास अफूचा अभ्यास करून सिध्दभोग केले. गुरुउपदेश देऊन रखमाबाईंच्या भेटीस आज्ञा घेऊन आले. रखमाबाईस सांगितले जे, मूल जानव्यास लाकूड म्हणतो, माझा उपाय नाही, बहुत प्रकारे सांगितले, युक्तिप्रयुक्तीने सांगितले, परंतु उपाय नाही. च्यार सोदे जवळ आहेत हे भांग आणून देतात, नित्य चार चार तोळे खातात अशी व्यवस्था आहे, मजवर पुढे शब्द आपण ठेवतील या कर्ता सांगावयास आलो, जन्मांतरयोगेकरून त्रिंबकराव याचा दोष आला होता तोही आपणच निवारण केला, आतां या यजमानास विचार उपाय करावयाचा योजिला आहे, आपल्या कानावर घालीन, मर्जीस आल्यास कर्ती येईल. तेव्हा रखमाईने धाराव यांस उत्तर केले की, उपाय कोणता आहे तो सांग. त्यावरून त्यांनी उपाय सांगितला. च्यार सोदे जवळ आहेत त्यांस धरून वेड्या ठोकून यजमानास पालखीत घालून आणवावे आणि तिसरे मजल्यावर ठेवून जेवणाखाण्याचा बंदोबस्त तेथील तेथेच करावा, जवळी पहा-यास मी आपली माणसे ठेवितो, दुसरे कोणास जाऊ देत नाही. असे सांगून, आज्ञा घेऊन, चाळीस पन्नास माणसे जमा करून, ठाण्यास जाऊन, दहापांचांस बेड्या ठोकून, यजमानास पालखीत घालून, चासेस आणून, तिसरे मजल्यावर ठेवून, कैद केले. जावे यावे आणि न्यूनाधिक्य इकडील तिकडे तिकडील इकडे सांगोन मनस्वी लबाड्या करून, द्वेष वाढविला. आपण दौलत लुटली. सा वर्षे कैदेत ठेविले. आपण आंतून कैफ द्यावा, रांडा नेऊन द्याव्या, दुःखे भरली पोर दिल्ही. त्यायोगेकरून हात पाय गेले व चेडे घालून वेडे केले. पुढे श्रीमंत नारायणराव यांचे गडबडेमधे जामदार-खान्याची कुलुपे तोडून, एकावन्न हजार रुपयांचे तोडे उचलोन नेले. याचे मुद्दे आहेत. याशिवाय जमावसूल व जमाखर्च जामदारखान्याचा व कोठीचा अगदी नाही व कापडासही ठिकाण नाही. अनेक प्रकारे आपली घरे भरली. असे धाराव! सदरहूप्रमाणे दिवाण सही. प्रथम केशोपंत पाटील. दुसरे मल्हार सिध्देश्र्वर. तिसरे धाराव. चवथे येशोबा. पांचवे उमाजी नारायण. सहावे गोविंदपंत नाना जोशी व मोरोबा दातार. हाली पांडोजी मुळीक व अन्याबा अभ्यंकर. एकूण असामी नऊ, अंतरचोर व बाह्यचोर असामी चवदा. एकूण असामी तेवीस. इतक्यांचे मुद्दे सांनिध्य आहेत. याशिवाय गृहचोर मथुराबाई, निळकंठराव यांची सावत्र आई, रखमाबाईची धाकटी सून, इने, रामचंद्र कृष्णराव मृत्यु पावल्यावर बेवीस वर्षे केश वाढविले, मनस्वी छंद करू लागली. रखमाबाईचे ऐकेना. निळकंठराव याचा व तिचा द्वेष वाढविला. तिने यास विषे घातली, चेडे घातले, अन्य उपद्रव केले.