चासकर दत्तकाची हालअपेष्टा

लेखांक ३
(पुढील वाक्यांत चासकर दत्तकाची हालअपेष्टा कसकशी झाली, त्याचा तपशील दिला आहे. जहागीरदार व इनामदार घराण्यांत बायका मुखत्यार व दुष्ट झाल्या असता आणि कारभारी सोदे मिळाले असतां, काय प्रकार होतो, ते ह्या यादीवरून चांगले कळून येते.)

यादी बाका- बाळ जोशी वरवडेकर वास्तव श्रीक्षेत्र वाई, ल्याहावया कारणे ऐसीजे – आमचा पुत्र कनिष्ठ, राजश्री निळकंठराव रामचंद्र चासकर यांस दिल्हा, वि राजश्री विसाजी नारायण वाडदेकर. यांस पूर्वसंबंध- आपले वडील केशो हरी व अंताजी हरी चुलते हे उभयतां श्रीमंत बाळाजी विश्र्वनाथ तागायत नानासाहेबापरियंत चाकरी करीत तीन पिढ्या पदरी होते. त्या समई राजश्री कृष्णराव महादेव चासकर यांचा व आपले वडिलांचा स्नेह विशेष. त्याचा आमचा मूळ पुरुष येक. पुढे कांहीका दिवशी कृष्णराव मृत्य पावले. त्यांच्या स्त्रिया दोघी; वडिल राजश्री गोपाळराव मिरजकर यांची भगिनी सगुणाबाई, दुसरी वीरवाडीकर साठे यांची मथुराबाई, येकूण दोघी स्त्रिया. त्यांस दत्तक बाबा असा निश्र्चय करून, रखमाबाई यांनी आपले वडिलास निरोप सांगून पाठविला जे, तुमचा पुत्र दत्तक आमचे सुनेस देणार, त्यांस येक मूल तुम्ही द्यावा. ऐसा निरोप ऐकून, उत्तर केले जे, मूल देतो, परंतु आपला कारभारी देऊन, दुसरा मूल मुलापाशी ठेवून, बंदोबस्त आमचा आम्ही करू. तुमचे कारभारी याचे स्वाधीन करणार नाही, दुसरी येक दोन कलमे दौलतीच्या कल्याणाची आहेत. ती सांगोन निरोप पाठविला. रखमाबाईस मान्य असल्यास पुत्र देतो, मान्यता नसल्यास जिथे मिळेल तेथे घ्यावा, असा निरोप गेला. तो रखमाबाईंनी ऐकून, जवळ कारभारी होते त्यांनी मान्य पडो दिला नाही. उपरांतीक आठ हजार रुपये देऊन उपाध्ये कोकणांत पाठवून, परगोत्राचे दोन पुत्र खरेदी घेतले आणि दोघींस दोन दिले. वडील निळकंठराव, कनिष्ठ त्रिंबकराव. दहा पांच वर्षांनी थोर जाहाले. श्रीमंत माधवरावसाहेब यांची स्वारी कर्नाटकांत निघाली. बरोबर त्रिंबकराव चासकर स्वारीबरोबर शंभर घोडी घेऊन गेले. कारभारी धाराव होते. स्वारीहून घरास आले. सविस्तर मजकूर स्वारीचा रखमाबाईस सांगितला. स्वारी खर्चाबद्दल सावकाराचे पंचवीस हजार रुपये घेतले. त्यासी करार केला जे, घरास गेल्यावर ऐवजाची निशा करून देईन, मग भोजन करीन. असा करार करून ऐवज घेतला. त्यास, जामदारखान्यांतून ऐवज देवावा, याप्रो बोलोन कचेरीस येऊन बसले. ऐवजाशिवाय खाणे करीत नाही, अशी अट घातली. तेव्हा स्वारी बरोबर कारकून होते. त्याणी त्रिंबकराव यांस सांगितले जे, स्वारी खर्चाचे रुपये चाळीस हजार यांणी खाल्ले, याचा हिशेब घेऊन ऐवज निघाल्यास द्यावा घ्यावा. याप्रमाणे समजाविले. त्यावरून धाराव यांसी बोलले, हिशेब दाखवा, नंतर पयका देऊ. ऐसे ऐकून, यजमानास उणी भाषणे मनस्वी बोलला. त्यावर त्रिंबकराव उठोन रखमाबाईंकडे गेले. कारभारी याची उणी उत्तरे सांगितली. त्याजवरून रखमाबाईस क्रोध आला आणि त्रिंबकराव यास सांगितले जे, यास तस्ती करून हिशेब घ्यावा. त्यावरून धाराव यास चौकीस बसविले. उपरांतीक बोलो लागला की, आता उमजले, हिशेब देतो, तीन दिवसाचा वायदा द्यावा, हिशेब तयार करून तिसरे दिवशी देतो. असा बोलो लागला. म्हणोन चवघांनी रदबदली करून चक्की उठविली. त्यावर त्याणे मूठवाल्यास सातशे रुपये करार करून, मारून टाकावा हा मनसुबा करून, पाटणकर याज करवून मेजवानीचे आमंत्रण देऊन, जेवावयास सांगितले. मूठ वाड्यामध्ये चालत नाही, सबब मेजवानीस वाड्याबाहेर काढून, भोजन करून माघारे येतात असा समय पाहून, मूठ चालवून मुडदा पाडिला. तसाच मुडदा उचलोन वाड्यांत आणिला. प्रहरसा घटकांनी मेले. मुठीचे मा-याने मेले. हे सर्वांस समजले. पुढे आठ चहू दिवसांनी मूठवाला धरिला. त्याने चिठी चहूशांची धाराव याचे हातची व रोख रुपये तीनशे या वाड्यामध्ये आणून दिल्हे. धाराव यास बोलावून आणिले, आणि चिठी पुढे टाकिली. कर्म घडले, म्हणोन मानिल्हेनी पदरी घेतले. त्याजवर तेथे विचार व्हावा तो येक दोन रोज न जाला. सबब, दुसरे कारकून उठून श्रीमंत माधवरावसाहेब यांजकडे आले, वर्तमान सांगितले. त्याणी रामशास्त्री यांजकडे चवकशी सांगितली. हा मार त्यांस समजला. त्याजवर धाराव याणे रखमाबाईस विनंति केली की, माझे पारपत्य जे करणे ते येथे आपण करावे, मजला पुणियास पाठऊ नये, आपल्या आज्ञेशिवाय कारकून परभारे गेले आहेत, त्यास श्रीमंतास पत्र लिहून येथे आणावे. असे बोलोन आपण रखमाबाईचे नावे श्रीमंतांस पत्र लिहिले, माझ्या घरचे बरे वाईट जे करणे ते येथील येथे करू, माझे पत्र येईल तेव्हा आपण मनांस आणावे, माझे आज्ञेशिवाय मेले कारकून तेथे आले आहेत ते माझे मजकडे पाठवावे. त्यावरून श्रीमंती कारकुनास शास्त्रीबाबांकडून लाऊन दिल्हे. पुढे त्रयोदशी होय तोपर्यंत, रखमाबाई, आधी वेदांती, योगाभ्यासी, धाराव अनेक टाणेटुणे जाणतो, तेणेकरून रखमाबाई भारून निळकंठराव यांची दिवाणगिरीची वस्त्रे घेतली. कारभार करूं लागले. (पुढे वर्षा दोवर्षी रखमाबाईस विनंति मूल शहाणा होण्याक-