तेव्हा रखमाबाईस संकट पडून, श्रीमंत नाना फडणीस यांस पत्र पाठवून, हुजरे नेऊन, बाईचे भद्रंकरण केले. उपरांतिक तिची वस्तवानी तिला देऊन, अजमासे याद तीन साडेतीन हजारपर्यंत तिला दिल्ही. याशिवाय घोडेगांवचा ऐवज तीन हजारांचा तोडून देऊन, फारखत करून, घेतले, दौलतीशी अर्थाअर्थी तिला संबंध नाही, काय कर्णे ते न सहस्त्रांत करावे, असे करारपत्र असतां, पुढे रखमाबाई मृत्य पावतांच, कारभारी यांस मूल पाहिजे सबब मथुराबाईस मिळोन, रखमाबाईचा ऐवज लक्षा दीड लक्षाचा लुटला. याचे बावटी कोण आहेत. पुढे वर्षाभ-यानी निळकंठराव मरू लागले. तेव्हा संस्थानास पुत्र द्यावा, अशी विनंति श्रीमंतास निळकंठराव यांणी करून, नाना फडणीस यांचे विद्यमाने व परश्रामभाऊ व हरिपंत तात्या यांचे विद्यमाने पुत्र घ्यावा, असे ठरले. नानाचे मर्जीस यईल तो घ्यावा. येथेही मुलाचे शोध केले, परंतु मर्जीस न आले. पुढे आम्हास राजश्री विसाजीपंत वाडदेकर यांजकडून पत्र द्यावा अशी भीड घालून, आमची चवदा कलमे मान्य करून, शपथक्रिया दिल्ही. साक्ष मोझ्यानिशी करार करून मूल आणावा असे ठरऊन, नाना फडणीस व परश्रामभाऊ यांस कळवून, पांच घोडी व पालखी बरोबर देऊन, परीक्षेस कारकून दिल्हा की, परीक्षा करून नानाची खातरजमा होय असे असल्यास घेऊन यावे, कदाचित निळकंठराव श्र्वेतकृष्ण जाले तरी दौलतीचा अधिकारी हाच मूल, असा करार येथे श्रीमंत माधवरावसाहेब व नाना फडणीस व परश्रामभाऊ यांचे विद्यमाने करार करून वाईस गेले. त्यासमई करार की, शपथ द्यावी, शिक्षक कारकून आमचे तरफेचे असावे, मुलाजवळ वडील मूल असावा, त्याची असामी चारशे रुपयाची असावी, दोन शिष्ये व खिसमतगार जवळ ठेवावा, आम्ही सान्निध्य रहावे, व मुलाचे संरक्षण विसाजीपंतांनी करावे, जुन्या कारभारी यांचे हाती देणार नाही. याप्रमाणे करार करून वाईस गेलो. मुलास घेऊन पुणियास आलो. नानांकडील कारभारी येऊन मूल पाहिला, मूल मर्जीस आला. त्यानंतर सरकारांतून निळकंठराव आळंदीस आणविले. आम्ही मुलास घेऊन आळंदीस गेलो. दत्तविधान करून पुत्र दिल्हा. वैशाख शुध्द ५ पंचमीस मुंज केली. दुसरे दिवशी निळकंठराव मृत्य पावले. मूल लहान, सबब क्रियाकर्म आपण केले. त्रयोदशी जाहल्यानंतर, जुने कारभारी व मथुराबाई करतील. असा मनसुबा करून निलकंठराव यांची बायको मूल कैद केले. आमचे दर्शन होऊं देईनात. निळकंठराव यांचा शागीर्दपेशा तरंगू लागला. आपण आळंदीस होतो. तेथे कारकू शागीर्दपेक्षा झाडून आले. त्यांनी विचारिले की, मूल धनीपणा करावयास दिल्हा किंवा कैदेत ठेवावयास दिल्हा, याचा विचार आपण केल्यावांचून आमचा तरणउपाय नाही, आम्ही सर्व आपणांस अनुकूल आहो, मथुराबाईचा संबंध अगदी नाही ही गोष्ट खरी आहे. तेव्हा आम्ही पुरःसर होऊन मथुराबाईसी वाद सांगोन, मुलास व मुलाचे आईस हाती धरून बाहेर काढिले, शागीर्दपेशा निळकंठराव याच्याजवळ ठेविला, विसाजीपंतास पत्र पाठवून नेले. त्यांणी मथुराबाईस फजीत केली; परंतु नाना खंबीर. रखमाबाईच्या कराराप्रमाणे चालावे, असे सांगितले असतां बहिरोपंती पयका खाऊन मथुराबाईस संस्थानापैकी अडचा हजारांचा सरंजाम आणखी देऊन, आणि काशीस जाते म्हणोन बहाणा करून आठ हजार रुपये घेऊन, बाई आपले घरी स्वस्थ बसली. तेथे चासेमध्ये धाराव यास मिळोन व कारभारी यास फितुर करून, जामदारखान्याची कुलुपे तोडून, पंचावन हजारांची पुतली पुण्यास आणिली. सोन्याचे देव दहा हजारांचे पुणियास मोडले. याचा विनियोग लौकिकांत समजाविला की, दरबारखर्च नाना फडणियास पुतली दहा हजार, बहिरोपंत फडके दहा हजार व बहिरोपंत मेहेंदळे दहा हजार, विसाजीपंत वाडदेकर पांच हजार, वजन घडी पुतली चुकली. पांच हजार रुपयांचा बाकीचा ठिकाण नाही. हा मजकूर मुलास व मुलाचे आईस समजू दिला नाही.