१ राजश्री रामचंद्र महादेव यांचे पाठीमागे राजश्री कृष्णराव महादेव यांणी कल्याणचा सुभा दोन चार वर्षे केल्यानंतर सरकारांतून सुभ्यावर ज्याजती रसद मार्गो लागले. त्यामुळे सुभा टाकून श्रीमंतासी रुसवा करून मोगलाईत गेले. कुटुंब चासेसच होते. तेथे गेल्यावर निजामनमुलूक यांजवळ चाकरीस राहिले. त्यांणी जागीर चाकरीचे सरंजामास दिली होती. तेथून श्रीमंतांनी समजावीश करून इकडे आणिले. ते समई निजामनमुलूक याणी ता को-हाळे पौगांव सुमारे अठरा सरंजाम यांजकडे ठेविला. पुढे मोगलाई-अंमल सरकारांत आला, तो रो मल्हारजी होळकर याजकडे दिल्हा. त्याजवर होळकरांनी क || को-हाळे येथील पाटीलकी घेतली आणि दिल्लीकडून कसबे को-हाळे व पोयगांव येथील इनामपत्रे आणिली. तेव्हा कृष्णराव यांजला वर्तमान लागले. ते समई होळकरांनी सांगितले की, माझी पाटिलकी आणि तुमची हालाकी हे ठीक पडणार नाही. तेव्हा कृष्णराव म्हणो लागले की, आम्हांस मोगलाईंतील जहागीर असतां, तुम्हांस आम्ही गांव घेऊ देणार नाही. त्याजवर होळकर बोलिले की, तुमचे दोन गांवचे मुबदला दुसरे गांव श्रीमंतांजवळ रदबदली करून देऊ. उपरांतीक होळकरांनी सरकारांत विनंति करून दोन गांवचे मोबदला गांव.


१२ता आकोल पो, ४ जुनर सुभ्या पो,

येकूण सोळा गांव दिल्हे; आणि पेशजीचे सरंजामाचे ता को-हाळे पो गांव १६ एकूण बत्तीस गांव इनाम करून द्यावे म्हणून विनंति केली. त्याजवर सदरहू गांवचे इनामपत्र कृष्णराव महादेव यांचे नांवे सरकारने दिल्हे. उपरि मानिल्हेस देवाज्ञा जाहाली. त्याजवर पांचा साता महिन्यांनी रामचंद्र कृष्णराव यांचे नांवे सदरहू गांवची इनामपत्रे करून दिल्ही.

१ चास येथील पाटीलकी मेळवली, तेव्हां पाटीलकीचा उपभोग चालावा आणि श्रीभामातीरी वास्तव्य करावे, याकरितां श्रीमंतांस विनंति केली की, कुटुंब चासेस रहाणार. तेव्हा सरकारांतून इनामपत्र करून दिल्हे. ते समई लोहगडीहून कुटुंब आणवून चासेस ठेविले. मातुश्री सिऊबाई लोहगडीहून चासेस येत जात होती. इनामपत्रे कृष्णराव महादेव यांचे नांवची आहेत. महादजीपंताचा व रामचंद्रपंतांचा त्यांत संबंध नाही.

१ मातुश्री सिऊबाईस देवाज्ञा जाली, ते समई कृष्णराव औरंगबादेस होते. मातुश्री रखमाबाई चासेहून लोहगडास अगोदर गेली होती. पुढे मानिल्हे औरंगाबादेहून लोहगडास आल्यावर, महिना दोन महिन्यांनी नारो रामचंद्र यांचे व कृष्णराव महादेव यांचे वांटे आपले घरांत आत्मीक गृहस्तांचे विचाराने जाहाले त्यांची नांवे,

१ भिकाजी नारायण भानू
१ नारो त्रिंबक सोमण,
१ गोविंदभट जोगळेकर,
१ शंकरराव पाटणकर,
१ मोरो गोपाळ गोळे,

एकूण पांचजण होते. ते समई वित्तविषय, दाणादुणी, भांडेकुंडे जे होते ते निमेनिम वांटून घेतले. कर्ज देणे होते ते आधी वारून, बाकी राहिले ते वाटून घेतले. गांव-शिवची वांटणी.
नारो रामचंद्र कृष्णराव
१ को वार्डे १ को घोडे,
१ मौजे लोनाड १ मौजे सेंदरूण,

शिवाय मौजे खवली मोघम ठेविली. वांटणी होणे होती, ती तैसीच राहिली.

१ नारो रामचंद्र यांस देवाज्ञा जाहाली, तेव्हां वांटणीप्रो मौजे वाडेगांव ब्राह्मणास मानिल्हेचे स्त्रीने दिल्हा. बाकी लोनाल्ड गांव वाटणीचा व मोघम खवली येकूण दोन गांव रा मोरो बल्लाळ यांची सरकारांत भीड होती यामुळे त्यांजकडे राहिले.

त्याची उपेक्षा मारनिल्हेचे भीडेमुळे केली.
१ पत्रांचा मजकूर.
१ कसबे घोडे येथील पेशजींचे पत्र महादाजी पंताचे नावे. त्यास, मानिल्हेस देवाज्ञा जाली. त्यावर रामचंद्र महादेव व कृष्णराव महादेव यांचे नावे राजपत्र आहे.
१ लोनाडा व वाडे येथील पत्रे रामचंद्र महादेव व कृष्णराव महादेव यांचे नांवे राजपत्र आहे.
१ खवलीचे पत्र महादाजीपंताचे नांवे व त्याचे भावाचे नांवे आहे.
१ सेदरूणचे पत्र नाही. नवरीकडून इनाम चालत होते म्हणून वांटणी करून घेतला.
१ वरकड पत्रे वगैरे जे आहे ते येकेले कृष्णराव महादेव यांचे नांवे आहे.