Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ४९८

श्रीशंकर
१७२२ आषाढ शुद्ध ११

श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री नानाजी स्वामीचे सेवेसीः-

विद्यार्थी विश्वनाथ महादेव थथे सां। नमस्कार बिज्ञापना येथील कुशल ता। आषाढ शुा ११ गुरुवार पो स्वामीचे आसिर्वादेंकरून सुखरूप असों. विशेष. स्वामीनीं कृपा करून पत्र पाठविलें. तें पाहून बहुत समाधान जालें. इकडील वर्तमान तरः श्रीमंत राजश्री दादा जुनराहून निघून वद्य ३० रविवारीं राजश्री बळवंतराव वाकडे यांचे बागांत संध्याकाळीं आले. शुा १ सोमवारीं तेथून निघून गारपिरावर आले. मी भोजन करून गेलों होतें. श्रीमंत चौघे व सिंदे आले होते. भेटी मोठ्या समारंभेंकरून जाल्यानंतर, सिंदे लष्करांत गेले. श्रीमंत राजश्री बाबासाहेब यांचे खवासखान्यांत राजश्री दादा बसले होते. त्यांच्या मागें राजश्री रामरावनाना बसले. समारंभेंकरून वाड्यांत गेले. चार घटका श्रीमंतांसीं एकांत होऊन, नंतर मुरलीमनोहराचे वाड्यांत राहिले. आठ दिवस मुहूर्त वाड्यांत यावयास नवता. याजकरितां आले नाहींत, सर्व मानकरी व ग्रहस्थ मंडळींच्या भेटी, आज अक्रा दिवस जाले, होतात. याजमुळें घटकाभर फावत नाहीं. शुा १० मंगळवारीं राजश्री सिंदे यांच्या येथें मेजवानी श्रीमंतांस जाली. अमृतराव गेले नाहींत. उभयतां व राजश्री दादा गेले होते. जवाहीर त्रिवर्गांस दिल्हें. वरकड मानक-यांस वस्त्रें दिल्हीं. श्रीमंतांनी दादास आजपो सा पोषाक दिल्हे. कंठी मोत्याची व शिरपेंच दिल्हा, शिंद्याकडील कंठी व शिरपेंच आला. शुद्ध ११ बुधवारीं दाहा घटका दिवसास मुहुर्तानसीं वाड्यांत आले. ग्रहस्थ मंडळी वाड्यांत आली होती. सर्वांस विडे दिले. आपला आसीर्वाद सांगितला. मी माझें पत्रांत लिहिलें होतें. यजमानाची स्वारी आलीच असेल. माझा आसीर्वाद सांगावा, याप्रों बोलले, आपलें पत्र यजमानास आल्यास त्यांत ल्याहावें की विश्वनाथ नाईक यांचे पत्रीं आसीर्वाद लिहिला होता; तो प्रविष्ट त्यांणीं केलाच असेल. याप्रों लिहिलें असतां मजकडे लबाडी येणार नाहीं. सूचनार्थ लिहिलें आहे. श्रीमंत राजश्री बाबासाहेब, पांच दिवस जाले, फडावर येऊन बसतात. कारभारही कांहीं मनास आणूं लागले आहेत. आपले आसीर्वादेंकरून बंदोबस्तही लवकर होईल, ऐसें दिसतें. मागाहून होईल तें लिहून पाठऊं. जेष्टाविशीं कल्पना आली आहे. बाह्य वदंता विपरीत बोलतात. अद्याप स्वस्थ आहेत. आपणास कळावें. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विज्ञापना.

ती। गंगाभागीरथी मातोश्रीबाई यांस बालकाचा सां। नमस्कार, विनंती लिा। परिसोन लोभ करावा. हे विज्ञापना.
पो आषाढ वा। १ शके १७२२.