Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ३३४

श्री. १७११ पौष वद्य १२

रु.

विज्ञापना. रा। असाराम विनायक भडोचकर हे मातबर सावकार. घरचीं जाहाजें चिनाई व विलायतेस जातात. इंग्रेजांमध्ये यांचा उदीम विशेष. याजकडे पा। भडोच येथील जकात होती. ते सालमजकुरीं मा।रनिलेकडील (..) दूसरीयास सांगितली. त्याजवरून यांचें मन खरें होऊन जंबुसरास आले. आह्मी बहुत प्रकारें खातरजमा केली. त्याजवरून त्यांणी तेथें दुकान घातलें. म्हणाले, जो मी रुई खरेदी करीन ते जंबुसर अमोद येथें बंदरी आणोन भडोचेस न्यावयाचा नाहीं, परंतु कांहीं रयात असावी. आम्हीं सांगितलें, तुम्ही मातबर सावकार, भडोचेहून येथें आलां, त्यास कांहीं तुमचे आईंकों, तुम्हीं फार वोढूं नये, सर्वांबरोबर हिसेब करावे, मग रयात करणें ते तुमचे आमचे विचारें होईल, तुह्मांस खटें करणार नाहीं. त्याजवरून, त्याची खातरजमा जाहली. मी आंकलेश्वरीं आलों, तेव्हां पर्वाच्या दिवशीं भेटावयास आले. म्हणाले, पहिलें अंकलेश्वरी बंदर होतें, मोंगलानें जबरदस्तीनें पाडलें. याजकरितां आमचे चित्तांत येथें बंदर करून सुरत व मुंबई येथून माल आणून कत करावी, तेणेंकरून सरकार किफायत, तुम्ही ह्मणाल इंग्रेज कांहीं दिकत करितील, त्याजविसींची जिमा माझा मी बंदोबस्त करीन. तेव्हां मीं सांगितलें, तुह्मीं म्हणतां तें खरें, परंतु जकातीचा आकार होईल तो गाईकवाड घेतील, सरकारांत नफा नाहीं. आधीं भडोचकर माझ्या नांवें हाका मारितात, येथें बंदर जाहलें ह्मणजे पाटीलबावास पत्रें पाठवितील, तेथून सरकारांत पत्रें येतील, तेव्हां ताकीद येविसीं होईल, केला श्रम व्यर्थ, यास्तव सरकारांत विनंति लिहितों, आज्ञा जाहलियास गाइकवाड याचा बंदोबस्त होऊन सरकार किफायत जाहलियास करून त्यांणीं मान्य केलें. त्याजवरून शेवेसी मजकूर लि।। आहे. जर करावयाची मर्जी असल्यास सरकार किफायेत आहे. पाटीलबाबांनी लिहिले असतां मग सरकारांतून आइकों नये असें पक्कें असल्यास आज्ञा असावी. आंकलेश्वरीं असाराम विनायक यांणी सिकंच्या कापूस पिकावयाचा घातला. चोहींकडील कापूस येथें गाठोडीं बांधावयास येईल. सावकाराचें मानस भडोचे बंदरची कमती पडे असें करावें. जसी आज्ञा होईल त्याजप्रों करीन. मौजे संजोद पा। आंकलेश्वर व मौजे शंकरपूर भाटे प्रों भडोच याचे सिवेचा कजीया पडला आहे. याजकरितां ऐवज भडोचकराचा अटकाविला आहे. यास्तव त्यांणीं जंबूसरचे सावकाराचा पैका भडोचेस चाळिस हजार पावेतों अटकाविला. आमचीं माणसें त्या ऐवजासमागमें होतीं. कारणें, टकसाळेंत रयाल आणविलें. तें त्यांणीं अटकावून ठेवले, तेव्हां, असाराम विनायक यांणीं सांगितलें कीं, तुम्ही सावकारी माल अटकावितां हे चांगलें नाहीं. आंकलेश्वराहून कागद व कारकून गेला, त्याणें बहुत सांगितलें तेव्हां त्याणीं तर, ऐवज सोडून दिल्हा. परंतु त्याचें मानस आमचा कोणी अटकाऊन पैकेयाचा निकाल करून घ्यावा. मी आलों तों नर्मदा भडोचेजवळ उतरलों परंतु खबरदारीनें उतरलों. त्याजला ऐवजाविसीं निकड लागली आहे. आह्मीं त्याजला सांगोन पाठविलें, सनद आणून द्या, किंवा जमीन द्या, पैका घ्या. त्याचें म्हणणें पडतें, जमिनीचे आकारापुरता ऐवज ठेऊन बाकी द्यावा. त्यास, हे गोष्ट घडल्यास करितों, आज्ञा असावी. सरकारांतून पाटीलबावास निक्षूण पत्रें जाऊन, तेथून भडोचकरांस जरबेचीं पत्रें आलीं म्हणजे ठीक पडेल. वाजबीचें गैरवाजबी होतें, येवढें वाईट वाटतें. शेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.