Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३३७
श्री १७११ माघ वद्य ७
पो छ २५ जमादिलाखर तिसैन
रु
सेवेसी श्रीराम सदाशिव कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना ता। छ २१ जमादिलावल, मु लष्कर गंगातीर नजिक कोसभर प्रांत तेलंग, यथास्थित असों, विशेष. राजश्री रघोजी भोसले याजकडील दिनचर्याः छ १ रबिलाखर प्रातःकालीं स्नान देवपूजा करून, च्यार घडी बाईकडे दरबार करून, प्रहर दिवसा स्वारी सकरदरियास गेली. तेथें डेरेराहुट्या पाहून आले. सायंकाळपासून दोन प्रहर रात्र पावेतों दरबार जाला. शिलेदार लोकांस वगैरे दोन दोन रोजमरे खर्चास देविले, व गंगातीरीं धर्मादावबद्दल दहा हजार रुपयांच्या अधेल्या पावल्या करावयास सांगितलें, गंगातीरी व मार्गी जातांना माहागाई बहुत आहे ह्मणून रस्त यावयास याचा मुलूक आहे तेथ पावेतों कमाविसदार यास ताकीद करविली कीं, जागा जागा परगणियांत वाणीउदमी असतील त्यांस सांगून गल्ला भरून लष्करचे मार्गी आणीत जावा. ह्मणून सांगाविलें. छ २ रोज प्रातःकालीं स्नान देवपूजा करून, भवानी काळो वे भवानीपंत मुनसी यांस बोलाऊन, दोन घडी खलबत करून, झाडून कमाविसदार मंडळी बोलाऊन त्यांजकडे बाक्या येणें त्या ऐवज लोकांस वराता करून देविल्या. छ ४ रोज प्रातःकालीं स्नान देवपूजा करून, आईकडें प्रहरभर खलबत केलें. जाधवांनीं तलबेकरितां अडविले होतें, त्यांचा जाबसाल चाघे मानकरी याजवर टाकली आहे. चौघांनी सांगावें तें उभयतां ऐकावें, असे केलें आहे. परंतु, हे चौघांचें ऐकतील हेंहि प्रमाण नाहीं. छ ५ रोज प्रातःकालीं हजामत करून माहादाजी लष्करी यांसी चार घडी खलबत केलें. स्नान देवपूजा करून, प्रहरभर बाळाबाई यांचे वोसरीवर बसून, पागेची घोडींशिंगरें आणून पाहिली. छ ६ रोज प्रातःकालीं माहादाजी लष्करी यासी दोन घडी खलबत करून स्नान देवपूजा केली. बाईकडे च्यार घडी जाऊन यशवंतराव नाईक रुसला होता त्यास, वेंकोजी भोसले पाठवून, त्यास समजावून आणविलें. छ ८ रोज मंदवार प्रातःकालीं स्नान देवपूजा करून, बाईकडे जाऊन, भवानीकाळोस बोलाऊन, दोन घडी खलबत जालें. तिसरे प्रहरीं स्वारी तयार करऊन पांढरा पोशाख करून, चौकडा मोत्यांची कंठी घालून, घोड्यावर स्वार होऊन पश्चिमेचे शुक्रवार-दरवाजानें निघोन, दक्षणेस सकरदरियाचे बागाजवळ डेरे दिल्हे, तेथें डेरे-दाखल, मागील दोन घडी दिवस राहतां, जाले. चिमाबाई वगैरे यांची स्वारी च्यार घडी रात्रीस डे-यास गेली. छ १० रोज प्रातःकाळीं स्नानदेवपूजा करून, भवानी काळोयासी च्यार घडीं खलबत केलें. प्रहर दिवसा स्वारीं निघून, सिताबर्डीजवळ संगमावर माहादेवाचें देवालय बांधितात तें पाहून, फुटाळ्या तळ्यावर जाऊन, घडीभर बसून, तळ्यांत मणूष घालून, पाणी किती आहे म्हणून पाहिले. तिसरे प्रहरीं सकरदरियास लक्ष्मीनारायणाचें दर्शणास गेले, छ ११ रोज कूच करविलें. पांच कोस मौजे पाचेगांव येथील मु।। करविला. डेरे व लष्कर वगैरे झाडून गेले. माघून स्वारी जावी, तों पिराजी जाधव याणें तलबेकरितां पेशजी स्वारी सिताबर्डीजवळ प्रहर रात्रपर्यंत अडविली होती, तेव्हां लटकी तोडजोड करून दिल्ही, त्याचा कज्या चुकला नाहीं, तेव्हां त्यांणीं आणखी सांगून पाठविलें कीं, माझे तलबेचा फडशा जाला नाहीं आणि स्वारी जाती हें ठीक नाहीं, तलब द्यावी तेव्हां जावें हें उत्तम आहे, नाहीं तरी स्वारी मागें कोणासी बोलावें, माझी तलब तो लक्ष सव्वालक्ष रुपये येणें, स्वारी गेल्यास मी येथें नागपूरचे वाणी बकाल व सावकार धरून दोन लक्ष रुपये वसूल करीन. या प्रमाणें जाधवाणीं सांगून पाठविलें. तेव्हां स्वारी जाणें राहिली. पुढील मु।। झाडून लष्कर गेलें. या मुकामीं खासे सडे व मुदसदी व बायकाच्या पालख्या मात्र होत्या. ते दिवशीं मु।। जाला. अवघी रात्रभर तळावर जागाजामा खलबत-या ठिकाणीं दोन घडी, येथून दुसरे ठिकाणीं दोन घडी या प्रमाणें-अवघ्या तळावर खलबत जालें. राहुटी, कनात, चांदणी कांहींच नाहीं. उघडे होते. सकरदरियाचे बागांतून भोजन करून येत होते. दोन दिवस बायका देखील पालख्यामधेंच बसून राहिल्या. छ १२ रोजीं जाधव तो कांहीं ऐकेना. याचें मानस चाळीस पन्नास हजार रुपये द्यावे. तेही चिठी-वरात द्यावी. जाधव तो एक रुपया सोडूं ना ह्मणेत. तव्हां, त्याजवर लटकाच दाब टाकून, हल्ला करून लुटून घेतों ह्मणून गारदी व शंभर दोनशें लोक पाठविले. हल्ला जाऊन उभी राहिली. त्यांणीं सांगून पाठविलें, हल्ला पाठवा, लुटून घ्या, आह्मी सिद्धच आहोंत, पाणिपतावर बुडालों अथवा बादामीवर मेलों म्हणूं, जिवावरच उदार जालोंत, परंतु तलब सोडणार नाहीं. याप्रमाणें सांगून पाठवीत. तेव्हां सायंकाळीं जाधवास अठ्ठावीस हजार रुपये नख्त देऊन, बाकी ऐवजाची निशा दोन महिण्याचे कराराणें महमद अमीखा पठाण शिवणीकर यांची दिल्ही. तेव्हां रात्रीं कूच केलें. प्रहर रात्रीस नगारा, निशाण, जरीपटका पुढें लाऊन दोन प्रहर रात्रीस स्वारी निघून पांचगांवचे मुकामास गेली. समागमें पन्नाससाठ राऊत होते. रात्रीं काशीकर सावकार आला. त्याची भेट जाली. शंभर मोहरा नजर ठेवल्या. जाधवाचे तलबेकरितां दोन दिवस घोळ पडला. झाडून लष्कर कूच करून पुढील मुकामीं गेले. खासे सडे उघडे होते. लाख रुपये देण्याचा मजकूर बहुतसा नाहीं. कारभारी-मुत्सद्दी यांजमध्यें कोणी भारी माणूस तोडजोड करून उलगडा पडेल असा नाहीं चाट्या-शिंप्या प्रमाणे मुछद्दी आहेत. छ. १३ रोज साता केसांचें कुच केलें, भोजन जाल्यावर प्रहर दिवसा घोड्यावर बसून, पेशजीं मुधोजी भोसले व साबाजी भोसले यांची लढाई जडली ते जागा मुकामापासून दोन कोस होती तेथें जाऊन पाहात होते. जिकडून तोफा लावल्या तिकडे त्यांचे लोक हुजरे होते. चौंहूकडे रण पाहून घोड्यावर उभे घडीभर होते. जागा बहूत यशस्वी आहे, ह्मणून बोलले. तेथून सायंकाळी स्वारी मगरधोकड्याचे मुकामास डे-यास आली. छ १४ रोज कूच नवा कोसांचें जालें. प्रहर दिवसा स्वारी निघोन, मार्गात मौजे चणवड व शिरसी येथील पागा व गाईचें खिलार पाहिलें. सायंकाळीं स्वारी गिरडचे मुकाम डे-यास आली. छ १५ रोज पंधरा कोसांचें कुच जालें. प्रहर दिवसा गिरडचा पीर डोंगरावर आहे त्याचे दर्शनास गेले. तेथून स्वारी निघोन सायंकाळीं शेगांवचे मुकामास आले. पंधरा कोस मजल भारी जाली ह्मणोन छ १६ रोजीं मु।। केला. छ १७ रोज प्रातः काळीं कुच जालें. रव पडली जैराम व बाजीराव पाटणकर यांणी तलबेकरितां येऊन अडविलें. तेव्हां स्वारी मागील मुकामींच राहिली. निमे लष्कर दहा कोस पुढें भाद्याचे मुकामास आलें. पाटणकर यांणीं अडविल्यामुळें तीन रोज स्वारी तेथेंच होती. पाटणकराकडे यांचें कर्ज होतें. ते तलबेंत वजा करून, त्याचा रोखा त्यास देऊन आणखी नवहजार रुपये नख्त दिल्हे. तेव्हां तेथून कूच करून भाद्याचे मुकामास आले. छ २१ रोज कूच करून सात कोस चंद्रपुरास तिसरे प्रहरीं आले. सायंकाळी माहाकाळी देवीचे दर्शणास स्वारी गेली. छ २२ रोज प्रहर दिवसा स्वारी शहरांत गेली. शहरचे दरवाज्यांत एक हल्या व बकरें मारिलें. किल्ला झाडून फिरून पाहिला. तेथून माहादजी गुजर याचें घरीं भोजनास गेले. तिसरे प्रहरी शिकारीस गेले. वाघरा वगैरे लाऊन पाहिल्या. शिकार कांहीं मिळाली नाहीं. दोन घडी रात्रीस डे-यास आले. छ २३ रोज प्रातःकालीं स्नान करून स्वारी निघोन शहराबाहेरून शहरास प्रदक्षणा केली. पहिले रघोजी भोसले याणें चंद्रपूर घेतलें तेव्हां गांवकुसास व दरवाज्यास जागाजागा तोफांचे गोळे लागले आहेत. ते झाडून जागाजागा उभे राहून पाहिले. तिसरे प्रहरीं शिकारीस गेले. तेथें पांचसात तितर मात्र मिळाले. सायंकाळीं डे-यास आले, चंद्रपुरास बहुता दिवसा स्वारी आली ह्मणोन तीन चार मुकाम करून शहर व किल्ला पाहिला. छ २६ रोजीं चंद्रपुराहून कूच जालें. नगारा, निशाण, जरीपटका, परसोजी भोसले याजबरोबर पुढें लाऊन स्वारी माघून दोन घडी दिवस राहतां मु।। आली. नगारा, निशाण,जरीपटका, स्वारीबा ठेवीत नाहींत. लोकांचे मुजरे घ्यावयाचा बहुत त्रास येतो. मागून स्वारीबराबर दीडशें दोनशे लोक असतात. कोणे दिवशी चाळीस पन्नास असतात. छ २८ रोज कूच दहा कोसांचें जालें. झाडीमुळें दिवसा मार्गात स्वारीस चालावयास रवेची वगैरे बहुत दाटी होती. स्वारी लौकर चालत नाहीं. झाडी बहुत, मार्ग लहाण, याकरितां मागील प्रहररात्रीस स्वारी सर्वांची निघून पुढें गेली. दोन प्रहरां मार्गात प्रणितो नदींत भोयाकडून मासे धरावले. तें जाळें तुटलें, मर्जी बहूत दिक्क जाली. जरीपटका, निशाण वगैरे मागून भवानी काळो घेऊन आले. छ २९ रोज कूच होऊन, स्वारी निघून मार्गात शिरपुरचा किल्ला पाहिला. तेथील दरवाज्यांत एक हल्या मारविला. छ १ जमा दिलावल च्यार कोस मौजे मेटंपल्लीचा मु।। जाला. छ ३ रोज सात कोस मौजे नंकलपल्लीचा मा जाला. छ ४ रोज पांच कोस कोटेपल्लीस मु।। जाला. छ ५ रोज गुरुवारीं पहिले प्रहर दिवसा स्वारी गंगेस आली. येथें चिनुरावर मोगलांकडील फौज दोन हजार पावेतों आहे. राजा रड्डी भेटीस आला होता. स्वारी येतांच त्याची भेट उभाउभी जाली. उभयतां क्षौर केलीं. तीर्थ उपास करून छ ६ रोजीं श्राद्ध केलें. छ १० रोजीं प्रहर दिवसा स्वारी सर्वांची, मु।। पासून काळेश्वर च्यार कोस आहे, तेथें प्रणितेचा संगम जाला आहे, तेथें स्वारी गेली. काळेश्वराचें दर्शण करून सायंकाळीं आले. छ ११ रोज तिसरे प्रहरीं राज्या-रड्डी डे-यास आला होता. च्यार घडी बसून गेला. छ १३ रोज स्वारी सर्वांची चिमाबाई वगैरे सुध्धां काळेश्वरास गेली. गंगादक्षणतीरीं मांडव घातले. वेंकाबाशास्त्री सोमयाग करितात. शास्त्रीबावांनी खाशांस विचारिलें कीं, याग करावा असें चित्तांत बहूत आहे, परंतु साहित्य कांहीं अनुकूल नाहीं. त्याजवरून खाशांनी सांगितलें, साहित्य काय पाहिजे तें देवितों. छ १४ रोज यज्ञास आरंभ केला. छ १६ रोज प्रहर दिवसा स्वारी, चिन्नूरचे किल्लयाजवळ अगस्तेश्वर महादेव आहे, त्याचे दर्शनास गेले. दर्शण करून किल्ला पहावा, अशी मर्जी होती. दोन प्रहर जाले, उशीर लागेल, पुढें एकादे दिवसा पाहूं ह्मणाले. भोयकिल्ला आहे, लहाण आहे, त्याचें लष्कर पायदळ दोन हजार पावेतों आहे, तें बाहेर किल्याच्या जवळच उतरलें आहे. यज्ञमंडप ठेंगणे घातले. त्यास तिसरे प्रहरीं, आहोती टाकते वेळेस, मांडवास आग लागली. त्याचे शांतीच्या आहोती टाकल्या. छ १७ रोजी तीन पशू, छ १८ रोजीं एक पशू, ऐसे च्यार पशू मारले. यज्ञमंडपांत शुद्रांणीं जाऊ नये, पाहूं नये. खासे नित्य जाऊन कुंडाजवळ बसत होते. आहोती टाकते वेळेस ब्राह्मणासी बोलावें. हे आहूत कोणती, कशाची ह्मणून पुसावें. होमाचे वगैरे ब्राह्मणांचे चाळीस पन्नास पात्रांचें स्वयंपाकाचें साहित्य नित्य कोठींतून पाठवीत होते. छ १९ रोजी यज्ञ समाप्त जाला. शास्त्रीबावा व आणखी ब्राह्मण खाशाजवळ बहूत स्तुती करीत होते:- महाराज ! यज्ञ बहूत चांगला झाला. हत्ती, नगारा, गारदी, तोफा, बंदुखा वगैरे बाराची शिलक समारंभ चांगला जाला. कृतायुगीं विश्वामित्राणीं यज्ञ केला होता, त्याप्रमाणेंच हा यज्ञ जाला. अशी बहुत स्तुती केली. परंतु हत्तीतोफा फुकटच्या होत्याच. वरकड, आणखी काही यज्ञसंबंधें धर्म किंवा ब्राह्मण-भोजन-संतर्पण केले नाहीं. होमाचे सोळा ब्राह्मण व आणखी पंचवीस तीस ऐशा पन्नास ब्राह्मणांस एक-एक रुपया दक्षणा दिल्ही. मुछद्दी, मानकरी, शिलेदार वगैरे याणीं यज्ञापुढें, कोणी मोहोर, कोणी दाहा रुपये, पांच रुपये ठेवले, ह्मणून, मराठे मानकरी वगैरे सर्वास मेजवानी शास्त्रीबावाकडून करविली. साहित्य कोठींतून पाठवून दिल्हें. नांव मात्र शास्त्रीबावाचें. ब्राह्मणांस व लोकांस बहूत भ्रम होता कीं, यज्ञास साहित्य लागेल तें देवितों ह्मणून खासे बोललेत. कनिष्टपक्षीं च्यार पांच हजार रुपये लागतील, असें सर्वांचें मानस. परंतु कांहींच न केलें, अजमासें च्यार पांचशे रुपये लागले असतील. गंगेस आल्यापासून दीडशें दोनशें गोदानें दिल्हीं व अन्नछत्र घातलें. नित्य दोनशें तीनशें च्यारशें ब्राह्मण जेवितात. बंदोबस्त चांगला नाहीं. तिनशें पात्राचा स्वयंपाक करवितात, तेथें पांचशें ब्राह्मण येतात. तेव्हां, ब्राह्मण उपाशीं उठतात. कोठाळे-कारभारी लबाडी करितात. त्याची चौकशी नाहीं. भूरदक्षणा ब्राह्मणास एकादों दिवशीं देणार व गजदान देणेंत आहेत. छ २० रोज राजारड्डी मोगलाकडील याची मेजवानी, मुदबखचें साहित्य व बकरीं, आली होतीं. ते निमें मानकरी वगैरे लोकांस वांटून देविली. महागाई, आठ दहा शेरांची घारण आहे. समागमें फौज एक हजार व तोफा लहाण अच्छेर गोळ्याच्या च्यार आहेत, व बाणाचे उंट दाहा, व गारद दोनशें आहेत. समागमें यात्रा नागपुराकडील वगैरे दोन हजार आली आहे. येथे शिवरात्र करून, आमावाशा जाल्यावर, चिमाबाई वगैरे वेंकोजी भोंसले एथून च्यार मजलीं राजेश्वरास जाणार. व रघोजी भोसले कूच करून शिरपुरास अथवा चंद्रपुरास जाऊन राहाणार. चिमाबाई राजेश्वराहून आल्यावर, हुताशनी चंद्रपुरीं करून संवत्सरप्रतिपदेस नागपुरास जावें असा मजकूर आहे. राजश्री भवानी काळो याणीं येथें लक्ष-होम केला. वोझ्याचे छकडे व कारखाने वगैरे काल पुढें नागपुरास लावले. स्वारीबार लौकर चालत नाहींत व तेथें माहागाई आहे, याजमुळें पाठविले. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना,