Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ९

श्री.
१६८५ श्रावण वद्य ९

तीर्थस्वरूप राजश्री लक्षुमणपंत दादा स्वामी वडिलांचे सेवेसीः-

अपत्यें बाबूराव विश्वनाथ वैद्य चरणावरी मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील क्षेम ता श्रावण वद्य ९ पावेतों मुा वांई समस्त सुखरूप असों. यानंतर. तुह्मांकडून बहुत दिवस कागदपत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. आह्मीं रघोजी पांड्या याजबा पत्रें पाठविलीं, त्यांचे प्रतिउत्तर येत नाहीं. तर, ऐसें नसावें. सदैव पत्नीं संतोषवीत असावें. यानंतर इकडील वर्तमान तरः तीर्थरूप राजश्री नाना व मातुश्री काकी श्रीगणपतीस सेवेबद्दल आहेत. त्यास कांहीं गूण अद्याप नाहीं. सुखरूप आहेत. वरकडे मार तरः या प्रांतें दंगा जाला. त्यामुळें कोणाकडील पैसा येत नाहीं. राजकी वर्तमान तरः श्रीमंतासीं व मोंगलासीं लढाई राक्षसभुवनापासीं जाली. मोगलास बुडविला. मोंगल पळोन आवरंगाबादेस गेला आहे. त्याजपाशीं च्यार हजार फौज आहे. त्याजकडील विठ्ठल सुंदर वगैरे मातबर सरदार पांच सात असाम्या पडल्या. श्रीमंत पैठणापाशी आहेत. वरकड इकडील वर्तमान अधिकोत्तर ल्याहावे, ऐसें नाहीं. सालगुदस्त येथून हुंड्या केल्या होत्या. यमाजी कारंजकर व लक्ष्मण शेट कारंजकर यांच्या. त्यास, त्यांनी रुा येथें थोडेबहुत वारले. त्याचा हिशेब करावा लागतो. त्यास, त्यांना कोणे मित्तीस रुा पावलें ते येथें लिहिलें आलें नाहीं. तर, ते मित्ती लिहून पाठवणें. तीर्थस्वरूप राजश्री नारोपंतकाका यांचे विद्यमानचे रुा हजार, रा गंगाधर भट चिपळूणकर यांचे देणें होतें तें, आह्मीं येथे व्याजसुद्धा त्यांस प्रविष्ठ केले. तुह्मांस कळावें म्हणून लिहिलें आहे. त्या प्रांतीं कोणाकडील ऐवज येतो र्की नाहीं, हे कांहीं कळत नाहीं. तें सविस्तर लिहणें. तुमचें घरीं समस्त सुखरूप आहेत. सविस्तर वर्तमान मुखवचनें बाबू सांगतां कळों येईल. मोहरीच्या देवालयाचे काम समाप्त जाहलें. शिखरास अस्तरगिरी होत आहे. दोन तीन महिन्यांत तयार होईल. राजश्री गमाजी यमाजी यांची व नरसिंगराव पागा यांची लढाई कराडावर जाहली. गमाजीचा मोड जाहला. दांतेगडावर पळून गेला आहे. वरकड पुणेंयांत छपरें व कांहीं घरें लोक बांधत आहेत. वाईंची खंडणी लोकांनी दिल्ही. परंतु आम्हांस पैसा देणें पडला नाहीं. तुमच्या घरास खर्चास रुपये शंभर देविले आहेत. कळले पा. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असों दिजे. हे विनंति. नारो गणेश दामले यांचे हुंडीचे रुा तेथें कोणे मित्तीस पावले, हें सविस्तर मित्या लिहून पा. हे विनंति.