Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

१७४७ त स्वतः बाळाजी काशींत जाऊन आला. १७५२ च्या डिसेंबरांत भालकीचा तह झाल्यावर जयाप्पा १७५३ च्या मेंत हिंदुस्थानांत जावयास निघाला त्यावेळीं काशीचें काम उरकून घ्यावयाची कामगिरी बाळाजीनें जयाप्पाला सांगितली होती. पुढें जयाप्पा कुंभेरचा वेढा झाल्यानंतर काशीकडे जाणार तों त्याला नागोरची कामगिरी आली व काशीचें काम तसेंच तहकूब ठेवून द्यावें लागलें. तरी देखील विजेसिंगाचे पारपत्य केल्यावर काशीकडे जाण्याचा त्याचा उत्कट मनोदय होता. लेखांक ३१ त १७५४ च्या मार्चांत बाबूराव महादेवाला जयाप्पा लिहितो, "तुमचा उपराळा करून श्रीचें काम शेवटास न्यावें यापरतें दुसरें अधिकोत्तर नाहीं". पुढें १७५४ च्या आगष्टांत जयाप्पा पुनः लिहितो, "त्यांचें पारपत्य यथायुक्त करून श्रीक्षेत्रांत अंमल खुलासा करणें हे गोष्ट चित्तांत फारशी आहे." जयाप्पा १७५५ त वारल्यानंतर १७५९ त दत्ताजीला काशी, प्रयाग व बंगाल ह्या प्रांतांवर स्वारी करण्यास बाळाजीनें सांगितलें; परंतु, अबदालीच्या गडबडीमुळें तें काम तसेंच राहिलें व पुढें कधीं श्री मराठ्यांच्या हातांत आली नाहीं. दक्षिणेंत सलाबतजंगावर १७५१, १७५२, १७५७ व १७६० ह्या सालीं पुण्याकडून व १७५३, १७५४ व १७५५ ह्या सालांत खानदेश, अलजपूर, येलगंदल वगैरे प्रांतांच्या रोखें मराठ्यांनीं सलाबतावर स्वा-या केल्या व त्याच्या हातांतून "बहुतेक सगळी दक्षिण १७६० त मोकळी केली" (लेखांक १६६). १७५१ त चार लाखांचा मुलूख, १७५२ त पन्नास लाखांचा मुलूख, १७५७ त पंचवीस लाखांचा मुलूख व १७६० त साडेएकसष्ट लाखांचा मुलूख सलाबतापासून बाळाजीनें घेतला. शिवाय १७५५/५६ त पंधरा लाखांचा मुलूख परशुराम महादेवाच्या हस्तें मिळाला. तो निराळाच (लेखांक ६५). तसेंच जानोजी भोसल्यानेंहि पाईनगंगेच्या अलीकडे आपलें घोडें बरेंच ढकलिलें होतें. सारांश, १७६० त सलाबताजवळ तेलंगणाचा पट्टा तेवढा उरला होता. बाकीचा सर्व मुलूख मराठ्यांच्या ताब्यांत आला होता. १७५९ पर्यंत बहादूरभेंडा, बेदनूर, होळीहोन्नूर, सावनूर, सोंधें वगैरे ठिकाणचे पाळेगार बहुतेक सर्व पादाक्रांत करून पेशव्यांनीं म्हैसूरचें राज्य बहुतेक संपुष्टांत आणिलें. पुढें तें संस्थान हैदरअल्लीच्या ताब्यांत गेलें. तेव्हां तें अजीबात खालसा करावें असा सदाशिवरावभाऊचा मनोदय होता. परंतु, अबदालीच्या गडबडीमुळे तें काम लांबणीवर टाकणें भाग पडलें. कोंकणांत शामळाची कासें, उंदेरी वगैरे स्थलें व तुळाजीचें विजयदुर्ग वगैरे किल्ले बाळाजीनें घेऊन, बहुतेक सर्व कोंकणपट्टी सोडवून घेतली. येणेंप्रमाणें १७६० पर्यंत, लाहोर, मुलतान, ठठ्ठा, भकर, अंतर्वेद, रोहिलखंड, कटक, नागपूर, माळवा, गुजराथ, काठेवाड, खानदेश, औरंगाबाद, विजापूर, कोंकण व किल्ले कोपलपर्यंत सर्व मुलूख मराठ्यांच्या साक्षात् अमलाखालीं बाळाजीच्या राजनीतीनें आणिला. येथपर्यंत मजल आणून ठेपल्यावर महाराष्ट्रधर्माचा प्रसार आणीक करावयाचा तों अबदालीची धाड आली आणि कांहीं कालपर्यंत आहे तेंच राखण्याच्या खटपटींत पेशव्यांस पडावें लागलें. ती खटपट १७६१ च्या पुढली असल्यामुळें तिचा विचार मी येथें करीत नाहीं. इतकेंच सांगून ठेवितों कीं, ह्याहि खटपटींत व्यवस्थित धोरण होतें (भारतवर्षांतील पत्रें, यादी वगैरे ८, कलमें ३/४/८/११). हें इतकें महाराष्ट्रधर्माचा प्रसार व ब्राह्मणपदबादशाहीची प्रस्तावना व विस्तार करण्याकरितां मराठ्यांनीं काय काय खटपटी केल्या तत्संबंधीं झालें. आतां पुढील विवेचनांत सातारच्या छत्रपतींची व्यवस्था करण्यांत पेशव्यांचें काय धोरण होतें त्याचा विचार करितों.