Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

ह्या क्लृप्तीला अनुलक्षून समर्थ म्हणतातः- "ब्राह्मणमंडळ्या मेळवाव्या । भक्तमंडळ्या मानाव्या । संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळी ।।" ह्या एका विचारानें भरलेल्या मंडळ्यांचें पुढारपण शिवाजीने व त्याच्या मुत्सद्यांनीं स्वीकारिलें; आणि स्वराज्याची स्थापना करण्याचे अतिमानुष कृत्य घडवून आणिलें. येणेंप्रमाणें महाराष्ट्रेतर प्रांतांतील हिंदुधर्म + धर्मस्थापना + गोब्राह्मणप्रतिपाल + स्वराज्यस्थापना + एकीकरण + धुरीकरण म्हणजे महाराष्ट्रांतील हिंदुधर्म होतो अशी त्या काळीं समजूत होती. ह्याच समजुतीला महाराष्ट्र धर्म म्हणून समर्थांनी संज्ञा दिली आणि ह्या धर्माची स्थापना व प्रसार करण्याकरितां शिवाजी महाराज व त्यांचे अनुयायी ह्यांनीं प्राणांचा व वित्ताचा अपरंपार व्यय केला. महाराष्ट्रेतर प्रांतांतील हिंदुधर्मास सहिष्णु हिंदुधर्म म्हटल्यास व महाराष्ट्रांतील हिंदुधर्मास जयिष्णु हिंदुधर्म म्हटल्यास ह्या दोन्ही धर्मांतील भेद उत्कटत्वेंकरून स्पष्ट होईल. दामाजीपंताच्या वेळचा स्तब्ध विठोबा सहिष्णु हिंदुधर्माची मूर्ति आहे व समर्थांचा उडुाण करणारा मारुति जयिष्णु हिंदुधर्माची पताका आहे. सारांश, १६४६ पासून १७९६ पर्यंत ह्या कल्पनेला मराठे साक्षात् स्वरूप देत होते व बरोबर १५० वर्षें ह्या कल्पनेच्या धोरणाने मराठे चालले होते. महाराष्ट्र धर्माची ही कल्पना मराठ्यांच्या ह्या १५० वर्षांतील हालचालींची केवळ प्राणभूत आहे. आतां ह्या कल्पनेचा निरनिराळ्या काळीं कसकसा आविष्कार झाला तें सागतों.

(अ) स्वराज्यस्थापना हें एक महाराष्ट्रधर्मांतील मुख्य अंग, तत्साधनार्थ शिवाजीमहाराजांचे सर्व प्रयत्न चालले होते. दुर्दैवाने शिवाजी महाराजांचा अस्सल लेख अद्यापर्यंत एखादा दुसराच उपलब्ध आहे. काव्येतिहाससंग्रहांतील ४११ वें पत्र शिवाजीमहाराजांनीं १६५९ त लिहिलें आहे. त्यांत राज्य आक्रमिण्याकरितां परराज्यांतील देसाई, देशपांडे यांस ते काय काय लालुच दाखवून बांधून घेत असत हें अंशतः कळण्यासारिखें आहे. ह्या पत्राचा सबंध उतारा खालीं देतों.

तहनामा राजश्री खेमसावंत व लखमसावंत देसाई बहादूर प्रांत कुडाळ यांजकडील पितांबर शेणवई कारभारी येऊन ठराव करून दिला. सुरू सन तिस्साखमसैन अलफ.

प्रांत मजकूरचे महाल वगैरे चालत आहेत. आकार होईल त्याचा ऐवज दरसाल निम्मे हुजूर पावता करावा. निम्मा आकार राहील त्यांत तीन हजार लोक पायदळ हेटकरी ठेवावे आणि ज्या वेळेस हुजूर चाकरीस बोलाविले जातील तेव्हां तीन हजार लोकांनिशीं सेवा करावी. खासा जातीनें येण्याचें प्रयोजन पडेल तेव्हां बोलावणें होईल. तेव्हां येत असावें. ... कलम १.