Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

विवेचन चवथें.

महाराष्ट्रधर्माचा म्हणजे संस्थांचा प्रसार व ब्राह्मणपदबादशाहीची स्थापना करणें हें बाळाजीच्या राजनीतीचें सर्वस्व होतें. ह्या मतलबाच्या सिद्धयर्थ महाराष्ट्रांत व महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचे प्रयत्न चालले होते. पैकीं महाराष्ट्राच्या बाहेर त्यानें काय खटपटी केल्या त्याचें दिग्दर्शन वरील विवेचनांत केले आहे. आतां खुद्द महाराष्ट्रांत त्याने काय खटपट केली तें सांगतों. बाळाजी विश्वनाथापासून बाळाजी बाजीरावासुद्धां सर्व पेशव्यांचा मुख्य हेतु स्वतःचें महत्त्व सर्वांहून अधिक वाढविण्याचा होता. धनाजी जाधवच्या मृत्यूनंतर चंद्रसेन जाधव शाहूचा सेनापति झाला. त्याला बाळाजी विश्वनाथानें प्रथम पिटून लाविलें. नंतर त्यानें बहिरोपंत पिंगळ्याला एकीकडे मारिलें व आपण मुख्य प्रधानकीचा अधिकार म्हणजे मराठ्यांचें धुरीणत्व मिळविलें. बाजीरावाचे मुख्य प्रतिस्पर्धी म्हटले म्हणजे श्रीपतराव प्रतिनिधि, त्रिंबकराव दाभाडे ब रघोजी भोंसले हे होत. ह्यांपैकीं पहिल्या दोघांचे महत्त्व १७३१ च्या आंत त्यानें पूर्णपणें नाहींसें केलें व पुढील ९ वर्षें मराठ्यांचें धुरीणत्त्व अनन्यसामान्यत्वेंकरून चालविले. रघोजीचें प्रस्थ कांहीं राहिलें होतें तें बाळाजी बाजीरावानें १६ जानेवारी १७४४ त मोडून त्याला आपला स्नेही केलें. शाहूच्या मृत्यूनंतर १७५० सालीं बाळाजीचें लहानसहान प्रतिस्पर्धीहि वर डोकें करू लागले व कांहीं वेळ त्याचे स्नेही सुद्धां त्याच्याविरुद्ध उठले. ताराबाई, जगजीवनराव प्रतिनिधी, यमादी शिवदेव, बाबूराव बारामतीकर, दमाजी गायकवाड व दाभाडे ह्यांना जागच्याजागीं बसविण्यांत बाळाजीला १७५० पासून १७५३ पर्यंत खटपट करावी लागली. ह्या अवधींत सदाशिव चिमणाजी व रामचंद्रबाबा शेणवई ह्यांना देखील प्रतिस्पर्धेच्या पिशाचिकेनें सोडिलें नाहीं. खुद्द रामराजाहि बाळाजीविषयीं उदासीन राहूं लागला. तेव्हां पहिल्या दोघांना मायावीपणानें फितवून बाळाजीनें रामराजावर आपला सर्व राग काढिला. सातारच्या छत्रपतींविषयीं बाळाजी बाजीरावाच्या मनांत फारशी प्रेमबुद्धि कधींच नव्हती. खुद्द शाहूमहाराजांशींहि बाळाजी बाजीरावाचें वर्तन धरसोडीचेंच होतें. परंतु बाळाजी बाजीरावानें हें धरसोडीचें वर्तन प्रथम घालून दिलें असें मात्र कोणीं समजूं नये. १७४० त चिमाजीआप्पा कोंकणांत असतां कांहीं राऊत गोवळकोंड्याकडे पाठवून द्यावे म्हणून शाहूनें चिमाजीला लिहिलें. तें चिमाजीला मान्य न होऊन चिमाजीचा व शाहूचा बराच खटका उडाला (भारतवर्ष पत्रें व यादी ३८). बाळाजी बाजीरावानें पेशवाईचीं वस्त्रें १७४० त घेतलीं. तीं त्याला महत्प्रयासानें प्राप्त झालीं. कांकीं रघोजी भोसल्यानें बाबूजीनाईक बारामतीकराला पेशवाई देवविण्याचा घाट घातला होता. परंतु महादोबा पुरंधरे व गोविंदराव चिटणीस ह्यांच्या विद्यमानें बाळाजीनें कशीतरी पेशवाई मिळविली. ह्यावेळीं जो त्रास झाला त्याचा सूड बाळाजीने अंतस्थ रीतीनें उगवून घेतला. इहिदे आर्बैन रौद्री नामसंवत्सरीं म्हणजे इ. स. १७४० सालीं कोल्हापूरचे संभाजी महाराज साता-यास आले असतां त्यांच्याशी बाळाजी बाजीरावानें एक गुप्त करार केला. त्यांत खालील कलम आहेः-