Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

त्या काळीं भरतखंडात सर्वत्र यवनांचे राज्य होतें व त्या राज्याच्या अंमलाखालीं महाराष्ट्रेतर प्रांतांत प्रजा आपला हिंदुधर्म म्हणजे व्रतें, उद्यापनें, उपासना, पूजा इत्यादि धर्माचार यवनांकडून कमजास्त त्रास पोहचत असतांहि, निमूटपणें चालवीत असत. महाराष्ट्रांतील प्रजा मात्र इतकी सोशीक नव्हती. देव फोडणा-या, विजापूर, अहमदनगर, खानदेश, जुन्नर, कोंकण वगैरे प्रांतांवर अंमल करणा-या यवनांनीं मराठ्यांना एका बाजूनें अगदीं सतावून सोडिलें होतें व दुस-या बाजूनें त्यांच्यांतील प्रमुख सरदारांना व मुत्सद्यांना मोठमोठ्या मानाच्या जागा दिल्या होत्या. त्यामुळें त्या वेळच्या मराठ्यांत यवनांविषयीं संताप व तो परिहार करण्याचें सामर्थ्य हीं एकाच वेळीं उत्पन्न झालीं. धर्म भ्रष्ट करणा-या, गाई मारणा-या व ब्राह्मणांचा छळ करणा-या यवनांविषयीं द्वेषबुद्धि महाराष्ट्रांत दामाजीपंताच्या वेळेपासून धुमसत होती व ती शिवाजीमहाराज अवतीर्ण व्हावयाच्या कालीं तर अत्यंत उत्कट झाली होती. यवनांचा उच्छेद करावयाचा हें त्या कालीं महाराष्ट्रांतील हिंदुधर्माचें एक कलम होऊन गेलें होतें. यवनांचा उच्छेद करावयाचा एवढाच त्या वेळच्या मराठ्यांचा हेतु नव्हता तर धर्माची स्थापना करून गोब्राह्मणांचा प्रतिपाल करावयाचा त्यांचा मुख्य हेतु होता. हा उत्तमोत्तम हेतु साध्य होण्यास नुसता यवनांचा उच्छेद करून काम भागण्यासारिखें नव्हतें, तर स्वराज्याची स्थापना करणें जरूर होते. तेंव्हा स्वराज्याची स्थापना करणें हेहि एक महाराष्ट्रांतील हिंदुधर्माचे मुख्य कलम होऊन बसले. स्वराज्याची स्थापना करण्यास दोन गोष्टी केल्या पाहिजेत असें शिवाजीच्या लक्ष्यांत आले. मराठ्याचें एकीकरण केलें पाहिजे ही एक गोष्ट व त्यांचें धुरीकरण म्हणजे पुढारपण स्वीकारिले पाहिजे ही दुसरी गोष्ट. कोणत्याहि वेळीं "बहुत लोक मेळवून एक विचारे भरल्या" शिवाय स्वराज्यस्थापनेची तयारी होत नसते व एवढेंच करून काम भागत नाहीं; तर एक विचारानें भरलेल्या लोकांचें धुरीणत्वहि पत्करण्यास व तें पत्करून इष्ट हेतु तडीस नेण्यास महापुरुषांनीं सिद्ध व्हावें लागतें. "बहुत लोक मेळवून एक विचारें भरण्याचें," काम शिवाजीनें संतमंडळींकडून करविलें.