Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

त्यानें मराठ्यांचा इतिहास लिहिला तो मराठ्यांच्याकरितां लिहिला नसून आपल्या देशबांधवांकरितां लिहिला आहे. मराठ्यांच्या पराक्रमांचें कौतुक वाटण्याचें त्याला कांहींच कारण नव्हतें. मराठ्यांचें बहिःस्वरूप मोठ्यांत मोठें होतें. केवढें व तें तसें कसकसें होत गेलें एवढें त्याला दाखवून द्यावयाचें होतें. व तें काम त्यानें समाधानकारक केलें आहे असें त्याच्या देशबांधवांचें मत आहे. मराठी बखरींच्यापेक्षां त्याचा इतिहास जास्त व्यवस्थित आहे हें इकडील लोकांसहि मान्य आहे; परंतु, स्वतंत्र इतिहास ह्या नात्यानें त्या ग्रंथांची किंमत महाराष्ट्रांतील इतिहासज्ञ निराळी करितात. कां कीं, (१) ग्रांट् डफ् नें आपला इतिहास मुख्यत्वें मराठी बखरी, मुसलमानी तवारिखा, सरदारांनीं दिलेल्या कैफियती व अशाच स्वरूपाची इतर टिपणें, ह्यांची संगति जुळवून तयार केला आहे. ह्या बहुतेक बखरी, तवारिखा व कैफियती कमजास्त प्रमाणानें अविश्वसनीय आहेत व त्यांच्या आधारावर रचलेला मराठ्यांचा कोणताहि इतिहास, अपूर्ण व अविश्वसनीय होण्याची बहुतेक खात्री आहे. (२) पुणें व सातारा येथील दफ्तरें व दुसरीं अवांतर कागदपत्रे ग्रांट डफ् ला मिळालीं होतीं हें खरें आहे. परंतु त्याचा त्यानें योग्य उपयोग करून घेतला नाहीं. काव्येतिहास संग्रहांतील पत्रें, ऐतिहासिक लेखसंग्रहांतील पत्रें व मीं सध्यां छापिलेली पत्रें हीं सर्व मिळून १७५० पासून १७६१ पर्यंतच्या अवधींतील अशीं सुमारें ४५० साडेचारशें होतात. त्यांवरून ह्या अकरा वर्षांतील ग्रांट् डफ् च्या इतक्या चुका दाखवून देतां येतात; त्याअर्थीं निदान ह्या अकरा वर्षांसंबंधीं तरी ग्रांट् डफ् नें पुणें व सातारा येथील दफ्तरांचा योग्य उपयोग करून घेतला नाहीं असें बिनदिक्कत म्हणतां येतें. (३) योग्य शिक्षणाच्या अभावामुळें कोणताच इतिहास लिहिण्याची व विशेषतः मराठ्यांचा इतिहास लिहिण्याची ग्रांट् डफ् ची योग्यताच नव्हती. पुणें व साता-यांतल्यासारखी भरपूर माहितीनें भरलेलीं अवाढव्य दफ्तरें जेम्स मिल्ल, गिबन, मोम्सेन, इन्ह, गिझो इत्यादिसारख्या शोधकांच्या हातीं पडलीं असतीं तर, त्यांचे त्यांनीं बावनकशीं सोनें करून दाखविलें असतें. (४) तो विदेशीय असल्याकारणानें मराठ्यांच्या पराक्रमाचा पाल्हाळ तर राहूं द्याच, परंतु, सविस्तर व साद्यंत माहिती देण्याची त्याला हौस नव्हती. विदेशीय लोकांना मराठ्यांच्या हालचालींचें सामान्य ठोकळ ज्ञान झालें म्हणजे आपलें काम झालें, अशी ग्रांट् डफ् ची समजूत होती. (५) त्यानें आपला इतिहास भौतिक पद्धतीनें लिहिलेला आहे व तोहि अनेक प्रकारें अपूर्ण झाला आहे. ह्यामुळें त्याच्या इतिहासाला, कीर्तने म्हणतात त्याप्रमाणें, अपूर्ण असा मराठ्यांच्या मोहिमांचा नामनिर्देशात्मक इतिहास असें म्हटलें असतां चालेल. ग्रांट् डफ् च्या इतिहासाला मोहिमांचाहि इतिहास म्हणतां येत नाहीं. कारण, मराठ्यांनीं ज्या शेंकडों मोहिमा केल्या, त्यांपैकी फारच थोड्यांचा म्हणजे एकीचाच त्यानें कांहींसा सविस्तर वृत्तांत दिलेला आहे. बाकीच्यांचा वृत्तांत कांहींच दिला नाहीं. तेव्हा 'मराठ्यांच्या मोहिमांचा इतिहास' असेंहि नांव ह्या इतिहासाला शोभत नाहीं. ह्या इतिहासाला "इंग्रजाना मराठ्यांची कांहीं माहिती देणा-या वृत्तांताचें इतिहासवजा पुस्तक" असें नांव दिलें असतां चालेल.