[५८] ॥ श्रीशंकर ॥ १२ मार्च १७५७
सेवेसी विज्ञापना. जानराव आइतवळे याणीं यंदा दोनचार लबाड्या केल्या. कोणत्या ह्मणाव्या तरी; एक तरी, सावनूरचे स्वारीस पागा घरीं बसविली व चाकरी सुधी न केली. आणि रूपये तरी, पागा सरकारची, सबब देणें पडले. बारगिराचे तैनातेंत मात्र काटकुसूर केली. बाकी रुपया द्यावा लागला. या वेळेस आह्मांस राग होताच. आह्मीं स्वामीचे कानावर घालून त्यास ह्मटलें कीं तुला सरनोबत१२४ देतों; आणि त्याचे विद्यमानें चाकरी करावी. जर कबूल न करीस तरी पागा काढून दुस-यास सांगतों. ऐसें ह्मटलें. तेव्हां प्रयासें सरनोबताचें कबूल केलें. परंतु हिशेब विल्हे लावून न घेत. तेव्हां शेवटीं बेलगंगेचे तळावर हिशेब हुसेनखान कायगांवकर सरनोबत ठहरावून, विल्हे लावून, पैका घेऊन, तयारीसाठी पाठविले. तेव्हां दुसरे दिवशीं सरनोबतास टाकून उठोन गेले. तेव्हां आह्मीं मागाहून सरनोबत त्याजपाशीं कागद देऊन पाठविले. त्यावर महिना पंधरा दिवस वाट पाहिली. तेव्हां जासूद जोडी जानरायाचें नावें मसाला१२५ करून पाठविली. त्या जासूद जोडीस मसाला न दिल्हा व धक्के देऊन बाहेर घातलें. याप्रमाणें जासुदांनी सांगतांच माझ्या हातापायाची आग जाहली. तेव्हां येथून राऊत पाठवून त्यास मारावें हें मनांत आलें. परंतु, पुरती तहकीकात करून मारावें ऐसें मनांत आणून मारावें ऐसा विचार केला. ऐसियासी, जर जासुदास धक्के देवून बाहेर लाविलें तरी डोकें मारावें किंवा निदानीं हात तरी तोडून टाकावा लागेल.१२६ स्वामींस कळावें ह्मणून लिहिलें असे. याचें कसें करावें तें स्वामींनीं लिहिलें पाहिजे. परंतु, जासुदास धक्के मारिले, मसाला न दिल्हा व हुजूरहि न आले. तेव्हां पारपत्य केलेंच पाहिजे. नाहीं तर आमची तरी अब्रू कशी राहील? र॥ छ २१ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें. हे विज्ञापना.
पे॥ छ १३ साबान