प्रस्तावना

आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षी ग्रांट् डफ् नें शाळा सोडिली. तोंपर्यंत व्याकरणभूगोलादि विद्यासंपत्ति जी कांहीं मिळाली ती घेऊन तो हिंदुस्थानांत आला व तेवढ्यावरती आपल्या लष्करी व मुलकी हुद्याला लिहिणेंसवरणें त्याच्या वरिष्ठांच्या मताप्रमाणें तरी त्यानें मोठ्या बहादरीनें केलें. पुढें पेशवाई बुडत असतां व बुडाल्यावर पुणें व सातारा येथील अवाढव्य दफ्तरें त्याच्या हातांत आलीं व त्याला मराठ्यांचा इतिहास लिहिण्याची स्फूर्ति झाली. परंतु उदार शिक्षणाचा म्हणजे प्राचीन इतिहासादि विद्यांचा जो कांहीं योग्य संस्कार मनुष्याचें मन उदात्त, कुशाग्र, ग्राहक व मार्मिक करण्यास लहानपणींच लागतो तो ह्या इसमाला झाला नसल्याकारणानें, आत्मिकरीत्या मराठ्यांच्या इतिहासाचें विवेचन करण्याचें तर त्याला सोडून द्यावें लागलेंच; परंतु, भौतिक पद्धतीनेंहि जें मराठ्यांच्या इतिहासाचें वर्णन त्यानें केले आहे तेंहि अनेक प्रकारे व्यंग आहे. कालविपर्यांसाचा दोष, मोठमोठ्या मोहिमाचें अज्ञान व सापेक्षदृष्ट्या कोणत्या प्रसंगाला किती महत्त्व द्यावें ह्याची नुमज, इतर मराठी बखरीप्रमाणेंच ह्याच्याहि इतिहासांत दिसून येते. १७५० पासून १७६१ पर्यंत झालेल्या रघुनाथरावाच्या मोहिमांच्या कालाचा ग्रांट् डफ् नें कसा विपर्यास केला आहे व त्यामुळें तो कसा गोत्यांत पडत गेला आहे हें मीं मागें नुकतेंच दाखवून दिलें आहे. त्याने मोहिमा कोणकोणत्या गाळिल्या आहेत ह्याचाहि निर्देश मागें झाला आहे व त्या वेळच्या मराठ्यांच्या अवाढव्य प्रयत्नांच्या मानानें त्या वेळच्या इंग्रजांचा प्रयत्न अगदींच क्षुद्र असून त्यांच्या वर्णनानें आपल्या इतिहासाची संकुचित जागा सापेक्ष दृष्टीनें ग्रांट् डफ् ने किती अडविली आहे, हें सुरत, विजयदुर्ग, बाणकोट इत्यादि ठिकाणीं इंग्रजांनी केलेल्या वळवळीचे पवाडे वाचून कोणाच्याहि ध्यानांत येण्यासारिखें आहे. ह्या वळवळीसंबंधानें ग्रांट डफ् चें स्वतःचेहि मत वर निर्दिष्ट केल्याप्रमाणेंच आहे. तो म्हणतो, इंग्रज महाराष्ट्राचे पुढें धनी झाले म्हणून ह्यावेळचीं हीं त्याचीं कृत्यें सविस्तर वर्णिलीं पाहिजेत. म्हणजे इंग्रजांच्या हिंदुस्थानांतील इतिहासाच्या महासमुद्रांत शेवटीं मराठ्यांच्या इतिहासाचा लोप होणार हें मत दृष्टीपुढें ठेवून त्यानें मराठ्यांचा इतिहास लिहिला. त्यामुळें शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला प्रारंभ झाल्यापासून म्हणजे इ. स. १६४६ पासून १७९६ पर्यंतच्या १५० वर्षांचा इतिहास त्यानें ४७५ पावणें पांचशें पृष्ठांत आटोपून पुढील २२ वर्षांच्या हकीकतीला २०० दोनशें पृष्ठें दिलीं आहेत. पहिल्या १५० वर्षांतील मराठ्यांच्या खटाटोपी किती अवाढव्य होत्या ह्याचा विचार केला तर पुढील २२ वर्षांना त्यानें जितकीं पृष्ठें दिलीं आहेत त्यांच्या मानानें ह्या १५० वर्षांना १२०० पृष्ठें तरी निदान देणें जरूर होतें. परंतु, इतकी विस्तृत माहिती दिल्यास ती आपल्या इंग्रजी वाचकांस रुचणार नाहीं हें ध्यानात धरून त्यानें आपल्या इतिहासाची रचना केली (Duffs preface). इतिहास लिहिण्यांत त्याचा मुख्य हेतु आपल्या देशबांधवांना मराठ्यांच्या संबंधी ठोकळ व त्यांतल्या त्यांत समाधानकारक माहिती देण्याचा होता. मराठ्यांचा इतिहास कसा तरी ओरबाडून जो त्यानें काढिला त्याच मुख्य कारण हेंच आहे.