[४४] ।। श्री ।। १५ जानेवारी १७५५
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाबूरावजी स्वामीचे सेवेसीः-
सेवक रामाजी अनंत स॥ नमस्कार विनंति येथील कुशल त॥ छ २ र॥खर मु॥ नागेर९९ प्रांत मारवाड जाणून स्वकीये कुशल लेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. पत्र पाठविलें तें पावलें. तेथें लिहिलें वृत्त त॥वार कळलें. फारसी कागद तुमचेंच नांवे लिहून नबाब सुजातदौलाबहादर यांसी पाठविला असे. व बकसीराम यानें तुमच्या इतल्याखेरीज हरयेक कामकाज न करणें ऐसें पत्र त्यास लिहिलें आहे. त्या प्रे॥ त्यास देणें आणि श्रीमंत राजश्री दादासे॥च्या आज्ञे प्रे॥ वर्तत जाणें ह्मणजे उत्तम असे. तुह्मी आह्मास वारंवार लिहितां परंतु आह्मी इकडे आलों. तुह्मी तिकडे राहीलां. राजश्री गोपाळराव कुंभेरीस आले होते त्याचे साइत्य ईश्वरें केलें. तुचा भोग सरला नवता! बरें! आतां श्रीमंतासमागमें देशास यावें. घर सोडून फार दिवस जाहाले. पुढें मागती गोपाळराव तुह्मी सारेच काशीस याल. कांहीं चिंता न करावी. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.