[८१] ।। श्रीदत्तात्रय ।। २५ सप्टेंबर १७५७.
पे॥ छ १० मोहरम रविवार साघटका दिवस प्रात:काळचा.
अर्ज विज्ञापना ऐसीजे येथील क्षेम ता। छ ९ मोहरम मंदवार तीन चार घटिका रात्र मुकाम शहर सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. प्रार्थना ऐसीजेः आज्ञापत्र सादर जालें तेथें आज्ञा कीं शुकवारी कुच करावें. तों नवा दिवस. शनवारीं वर्ज वार. रविवारीं कुच करून पेडापुरावर मुकाम फर्मावणार. शहरच्या पूर्वेस जावयाचा निश्चय असतां सांप्रत त्या लिहिलें जे बाणशेंदरेया रोखें जावें ऐसी नवाबाची मर्जी. यास्तव बाणशेंदरे हिकडेच मुकामात करूं ह्मणोन विस्तारें. आज्ञा. ऐसीयास नवाबाची मर्जी तो पूर्वेस शहरच्या डोंगर आंगें यावें. यांत निजामअल्लीवर दबाव व चारा आहे व हकीमजीस जवळच घेऊन येतों. कामें सत्वर उरकावीं. तदनंतर आणखी कामास मुतवजे व्हावें. आज्ञापत्र ऐसें आलें जे श्रीमंत प्रताप वरिष्ठाभिधान राजश्री पंतप्रधान साहेबाची आज्ञा जे कासारबारीकडे जावयाची व खानदेश जुनें काम व गुजरात मोठें काम, हीकडे दबाव. ऐसीयास कासारबारी फार दूर; बाणशेंदरें जवळ. परंतु उगेच तिकडे जाणें उचित नाहीं. रोख दाखवावा कीं शहरच्या पूर्वेस मुकामास जावयासि कुच फर्माविलें. व दोन कुचे, येक अवल कुच, पेडापूर; दुसरें पुढें तीन चार कोस. तदनंतर नवाब बसालतजंगाकरीं स्वामीस लिहीवीन कीं बाणशेंदरें या डोंगराआंगें मुकामात करावे. हकीमजीसहि पाठवितों. तुर्त शहरच्या पूर्वेस न जावें. तदनंतर बाणशेंदरेंया रोखें मुतवजे व्हावें. ऐसी विनंति लिहिली. सांप्रत आज्ञापत्र सादर जालें त्यांत आज्ञा साफ कीं बाणशेंदरें इकडेच जातों, ऐसे जाहेर साफ नसावें. चिंता जाहेर ऐसें नसावें खानदेश वगैरे मनसुब्यामुळें बाणशेंदरेंया रोख मुतवजे व्हावयाचे असो. परंतु जाहेर हेंच असावें कीं शहरच्या पूर्वेस चारा आहे तेथेंच मुकामात करावी. याच गोष्टीच्या पोटांत निजामअल्लीवर दबाव. तो पुढें एकंदर येऊं पावणार नाहीं. दुसरे फौज स्वामीब॥ किती हें कळावें, तैशासारिखी विनंति, जेथें मुकामात करणें उचित तेथें करावे, असी केली जाईल. निजामअल्लीस स्वामी गंगा उतरल्यावर खबर कळेल, तो काय मनसुबा करितो हेंहि कळेल. खुलासा रविवारीं कुच करून पेडापुरावर यावें तोंवर आणखी नवाबाच्या व सरकारच्या कार्यास उचित प्रेषीत विनंति करीन सांप्रत आपाजी धोंडाजी याचे विद्यमानें निजामअल्लीचें राजकारण आलें कीं श्रीमंत माझी दस्तगीरी करतील तर चित्तानरूप सलूख करीन. फिरंग्यास एकंदर येऊ देणार नाहीं. भोसले यासी जैसें सांगाल तैसें करीन, त्याजला उत्तर दिल्हें जे हा मजकूर हुजूर लिहितो; हुजूरून पुण्याचा जाब यावयास दहा दिवस लागतील; तोंवर तुह्मी पुढे येऊं नये; याल तर सरकारची फौज धाऊन येऊन गळा पडेल; काम तुमचे सर्व नासेल; यास्तव जवाब येईल तोंवर उगेंच राहाणें. राहातील. दरमियानच्या दिवसात हकीमजीस घेऊन येतों. गुंता उरकून घेऊं. निजामअल्लीनें पन्नासाच्या जागीरी दिधल्या तर कार्याच्या नाहींत. बदमामली असे. परंतु फिरंग्यास एकंदर येऊं देणार नाही, स॥ इमराइमखा गारदी फिरंग्याचा दुषमन त्याजब॥ आहे. बसालतजंग प्रामाणिक यासच स्थापावें आणि सरकारचें काम करावें. हणमंतराव निंबाळकर व महाराव जानोजी या सेवकानें आपले सूत्रीं लाऊन घेतलें. जालें राजकारण यांत पीळपेच नाहीं. निजामअल्ली न यावा इतकाच मात्र तरतूद. व जें राजकारण आलें तें खावंदास ल्याहावें. कदाचित् निजामअल्ली भावास बाहेर सलूख दाखऊन आला आणि दगा केला तर हेंहि सूत्र असावें, यास्तव लाऊन ठेविलें असे. शहानवाजखानाकडे पैगाम केला आहे. त्याणें माझे मुदे माफीक काम केले तरी बरेंच आहे. लक्षप्रकारें करावेसें आहे. कदाचित् उचित रीतीनें पैका कबूल न केला तरी किल्ला नवाबास घ्यावयाची परवानगी द्यावी. आणखी जागीर नवाबाकरीं सरकारांत देवितों हाहि मजकूर उगाच लिहिला असे. खातरेंत असावे. नवाबसाहेब थोरले नवाब सलाबतजंग यांणीं एकांती हकीमजीचें विद्यमानें दोन मसविदे, येक बसालतजंगास पत्र, ऐसे हुजूरचे पुण्याहून आणवावे व त्याच पत्रांत जवाब श्रीमंत स्वामीस बसालतजंगानी ल्याहावा ह्मणोन मसविदा आहे तोहि घालावा. तरी हे विनंतिपत्रांसहित मसविदे दोन्ही पारसी बजिनस हुजूर पाठवावे. त्याप्रमाणें पत्रें तेथील आणवावी. निजामअल्लीचे तर्फेनें दोघे भले माणूस मुसलमान नवाबापासीं जबाबसालास र॥ जाले. उदईक येतील. येथूनहि दोघे रुखसत जाले. तेहि उदईक जातील. हकीमजीस व या सेवकास हुजूर यावयास विलंब नाहीं. परंतु निजामअल्लीचें निस्तुक जालें पाहजे. नवाब सलाबतजंगानीं लेहून बसालतजंगास पत्रें आणविलीं ऐसें नसावें श्रीमंतासच थोरले नवाबाचें फार अगत्य यास्तव लिहिले ऐसें असावें. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.