[८२]                                                                ।। श्रीदत्तात्रय ।।                      २६ सप्टेंबर १७५७.

पे॥ छ ११ मोहरम सोमवार प्रातः काळ सूर्योदय.

अर्ज विज्ञापना ऐसीजे येथील क्षेम ता। छ १० मोहरम रविवार दीड प्रहर रात्र मुकाम शहर सेवकाचें वर्तमान यथास्थित असे विशेष. प्रार्थना ऐसीजे. आज्ञापत्र सादर जालें. तेथें आज्ञा कीं खासा स्वारी गंगातीरप्रांतें येऊन बारा दिवस जाले. जीवनराव येऊन कामकाज विल्हे लावीत नाहींत. तेव्हां काय प्रकार आहे हें कांहीं कळत नाहीं. हे सुधे नाहीं ह्मणोन लोक चर्चा करितात. पाहाता बारा दिवस येऊन जाले. तुमचें येणें होत ` नाही, तेव्हां संशयास जागा होते, यास्तव तुह्मी उदईक येथें येऊन सर्व कामें विल्हेस लावणें. अतःपर निजामअल्लीच्या येण्या न येणियाची वाट न पाहाणें. तुह्मीं पेच पाडून ठेविलाच आहे. तुझा बंधु यास तेथें ठेऊन हकीमम॥अल्लीखास घेऊन हुजूर येणें. तुझ्या येण्यानें सलुख खराखुरा जाला हा लौकिक होऊन, कामें विल्हेस लागून, दुसरेकडे मुतवजे होणें. कामें मंजूर आहेत ह्यणोन विस्तारें आज्ञा. ऐसीयास येथें चिंरजीव अवधूतराव केशव यास ठेऊन सेवक व हकीमम॥अल्लीखा सोमवारीं छ ११ मोहरमीं येथून स्वार होतों. दोहीं दिवसांनीं पायावर डोकी ठेऊन ती आपल्यास सनाथ करून घेतों. जाली मामिलियेत यात पीळपेंच नाहीं. कदाचित् बसालतजंग मेला अगर कोण्ही दगा करून धरला तरी राजकारणास आठचार दिवस विलंब लागेल. वरकड गुता नाही. निजामअल्लींत यात पेच पाडलाच आहे. सर्व मतलब सख्तहि करून घेतले. माहाल नेमावे आणि परवाने करावे. अहद पैमान व्हावे तें सर्व स्वामीपासीं आल्यावर अर्ज करितों. यापूर्वी दोन तीन आज्ञापत्रें सादर जालीं त्यात खुलासा जे बाणशेंदरे प्रांत कन्नड व कासारबारी या डोंगरांत चारा आहे व पाणी उत्तम मनसुबे फार पोटांत याच गोष्टीचा आहे ते त्याजवरून नवाबसाहेबास या सेवकानें सांगितलें कीं निजामअल्ली जाफराबादेपलीकडे त्याच डोगरांत दाभाडी वगैरे येथें चारा आहे. श्रीमंत सद्गुणस्वभाव राजश्री रावसाहेबाकडेच मुतवजें होणार व मुकामातहि करणार, यास्तव नवाबसाहेबीं बहुत स्नेहाने लिहिलें की इकडे न जावें. बाणशेंदरेयाचे रोखें जावें तेथें मुकामात करावें. हकीमम।।अल्लीखा व जीवनराव यास सोमवारी र।। करितों ह्यणोन नवाबानीं लिहिलें आहे तो खलिता बजिनस पाठविला. पावेल. जवाब उत्तम गोड पाठवावा. बाणशेंदरेकडेच जातो ह्मणोन ल्याहावे. उदईक सोमवारीं हकीमजी डेरे दाखल होतील. मंगळवारी दोनप्रहरा येथून चालतील. बुधवारीं सेवेसी येतो. मजला विलंब नाही. परंतु मोगलाई कारभार सुस्त फार असे. खुलासा हकीमजीस घेऊन सेवेसी पोहचलोंच यांत संशय नाहीं. बाणशेंदरें प्रांत कनड येथें मुकामात करावें. शहरापासून चवदा कोसांवर असावें. दौलताबादेपासून आठ नव कोस पलीकडे असावें. डोंगरचारा आहे. तेथें जावयास मार्गी लहान लहान कुच चव चव कोसाचे करावे. इतकियांत निजामअल्लीची खबर कळेल. नवाबहि बाहेर निघतील. दो ती दिवसांनी जसवंताच्या तलावावर राहतील. रूख निजामअल्लीकडील तरी बसालतजंग जीवंत आहे तरी याच्या बोलल्या गोष्टींत तिळभर अंतर नाही. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.