[३९]                                                                           ।। श्री ।।                                                      २९ आगष्ट १७५४

 

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाबूरावजी स्वामी गोसावी यांसः-

सेवक रामाजी अनंत स॥ नमस्कार विनंति येथील कुशल त॥ छ २९ सवाल मु॥ मेडते प्रांत मारवाड जाणून स्वकीये कुशल लेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वृत्त कळलें. येणें प्रमाणेंच सदैव वृत्तांत त॥ वार लेहून प॥ जाणें. तुह्मी दिल्लीचा मजकूर लिहिला. ऐसीयास, आह्मी दिल्लीच्या९५ कामांत नाहीं. दिल्लीचें जें बरें अगर वाईट तें सर्व श्रीमंताकडे व राजश्री सुभेदाराकडेच आहे. आह्मी प्रस्तुत मारवाडच्या कामास आलों आहों. ईश्वरी कृपेनें ईकडील काम९६ सिध्दीस गेलियावर त्या प्रांते येऊन. आबांचा? आमचा स्नेह आहे त्या प्रे॥च आहे. दुसरा विचार नाहीं. तुह्मी कोणे गोष्टीची चिंता न करणें. बक्षीरामाचा मजकूर लिहिला तरी त्यांनीं सनदेशिवाय खर्च केला तरी मजुरा पडणार नाहीं. तुह्मीं श्रीमंत राजश्री दादास्वामीसहि वरचेवर लिहीत जाणें. तेथून ताकीदपत्रें पाठवितील. येथील पत्रें पाठविलियानें काय होणें? जेव्हां त्या प्रांतें फौज येईल तेव्हां सारेंच उत्तम होईल. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.