[७७]                                                                    ।। श्रीदत्तात्रय ।।                                     १८ सप्टेंबर १७५७.

पे॥ छ ३ मोहरम अवशीची सवा प्रहर रात्र

अर्ज विज्ञापना ऐसीजे. येथील क्षेम ता॥ छ ३ मोहरम रविवार दोन प्रहर मुकाम शहर सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. प्रार्थना ऐसीजे. दौलताबादचे मोर्चे कुल उठले. कुल सरकार सैदअकबरखान, मेटीअल्लीखा व मुरादखा व नसीरजंग वगैरे कुल आपल्या घरास आले. याउपरि दौलताबादेंत गल्ला वगैरे जे चित्तास येईल तिकडून जावा न्यावा. कोणी मुजाहीम नाहीं. याउपरि आज अगर उद्यां अगर परवां निजामअल्लीचा गुंता उरकून सेवेसी खान अलीशान हकीमम।।अलीखा यास घेऊन येतों. सर्व फैसला करार जाल्याप्रमाणें अमलांत येईल. निजामअलीसी यासी पेच मोठे हिकमतीनें पाडला. आतां पस्तावले. परंतु मोठें काम हें खावंदास कळावें. मी येथें रिकामा बसलों नाहीं. सरकार कामावर बसलों. हुजूर पत्र पावतांच न आलों ह्मणोन रागास न यावें. जानोजी भोसले यासी व निजाम अल्लीसी पेच मोठे *हुनेरे पाडला. श्रुत असावें. महाराव जानोजी केवळ निखालस सर्व प्रकारें दौलतखा स्वामीचा आहे. आद्यंत गोष्टींत तिळभर पिळपेंच न देखिला. नित्य एका दिवसा आड भेट होत असती. जिकडे स्वामीची मर्जी तिकडे माहराव जसवंत निंबाळकर; यांत अंतर नाहीं. हकीमम॥अलीखास घेऊन येतों. किल्याचे मोर्चे उठले. आतां तरी मोगलाच्या करारमदाराचा इतबार असावे. ज्या राजकारणांत पीळपेंच असेल त्या कामांत मी येणार नाहीं. मी काहीं मातबर नाहीं, गरीब असे. माझे विनंतींना इतबार असावा. हे विनंति. हेंच पत्र हुजूर पुण्यास जावें. खोजे रहमदुलाखाबहादर व हकीमम।।अलीखा याचा रुका आला तो बजिनस पाठविला, पावेल.