[७८] श्रीभवानीप्रसन्न. २२ सप्टेंबर १७५७.
पे॥ छ ७ मोहरम गुरुवार तृतीय प्रहर.
श्रीमंत सद्गुणनिधान साहेबाचे सेवेसी:-
आज्ञाधारक कृष्णाजी त्रिंबक साष्टांग नमस्कार उपरी विनंति. आजी गुरुवारी छ ७ मोहरमी येथे कांही कवतुक जालें तें विनंति करितो. काल नवाब सलाबतजंग राजश्री जानोजी निंबाळकर यांचे घरास रंभापु-यास संध्याकाळी येकबयेक विसापंचविसा माणसानसी गेले होते. मागून वाद्य व सवारीचा सरंजाम जाऊन पावला. तिकडून येता बसरंजाम आले. इतकें काल जाले होते. आज प्रातःकाळींच गजराचे वेळेस स्वारी तयार करविली जे बेगमचे मुकब-यास जातों. त्याजवरून कितेकांनी त्याच वेळेस येऊन बसालतजंगास सांगितलें जे शहानवाजखानाकडे दौलताबादेस रातोरात श्रीमंताची फौज येऊन त्यास घेऊन श्रीमंतापासी टोक्यास गेले व नवाबांनींहि स्वारी तयार करविली. नवाबहि तिकडेच जाणार. काल जानोजीसीं हेच मसलहत केली होती. त्याचे बले नवाब निघून जाणार ऐसें बसालतजंगास सांगताच बसालतजंग स्वार होऊन नवाबाचे घरास गेले व शहरचे दरवाजे बंद करविले. ऐसी हुल्लड येक प्रहर दिवसापरियंत जाली. शेवटीं शाबीत जालें जे सर्व लटकें. नवाब बेगमचे मुकब-यास जाणार. तेव्हां बसालतजंग उठोन आपले घरास आले. जालें वर्तमान विदित व्हावे ह्मणोन विनंति लिहिली असे. हे विनंति.
फिरंग्याकडील वर्तमान आलें जे छ १० जिल्हेजीं ईसाकपटणीहून डेरे बाहेर केले होते जे इकडे यावें. तदनंतर छ १४ माहे मजकुरीं तेथून दिढा कोसाचें कुच केलें. पुढे कुचदरकुच इकडे येणार. इतकें वर्तमान आलें. विदित हाय. हे विनंति.
हें वर्तमान श्रीमंतसगुणमूर्ति साहेबांस लिहिलें नाही. हेंच विनंतिपत्र पुण्यास रवाना करणें उचित असलें तरी रवाना करणार स्वामी समर्थ असेत. हे विनंति.