[३१]        पै॥ छ १ जमादिलाखर                                          ।। श्री ।।                                              २६ मार्च १७५४ पैवस्ती

 

राजाश्रियाविराजित राजमान्यराजश्री बाबूराव स्वामीचे सेवेसीः-

सेवक रामाजी अनंत साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावोन लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. ऐशियास, तुमचा उपराळा करून श्रीचें काम शेवटास न्यावें यापरतें दुसरें अधिकोत्तर नाहीं. त्या प्रे॥ येथें राजश्री गोपाळराव आलियावर श्रीमंतास व सरदारांस जे विनंति करण्याची ते केली. व येथून नवाब सफदरजंग यास लेहून त्याजकडून वकिलास सांगोन त्याजकडोन नवाबास अर्जी लेहविली. परंतु त्याजवरच मदार नाहीं. राव मशारनिलेस अंतर्वेदींत मामलत सांगोन पाठविलें. तेथील बंदोबस्त करून मशारनिले येथें लवकरच येतील. उपरांतिक पका विचार होणें तो होऊन येईल. तुह्मी आपली खातरजमा राखोन कोणेविसी चिंता न करणें. येविसी श्रीमंतांनीं तुह्मास लिहिलें असेल त्याजवरून कळेल. ज्या प्रे॥ श्रीमंतांची आज्ञा होईल त्या प्रे॥ च वर्तणूक करावी. येथील सर्व वर्तमान तुह्मी जाणतच आहा. बरें, इतके दिवस झाले. आतां थोडक्यासाठी उतावळी न करावी. हे या प्रांतांत आहेत तों पावेतों वाट पाहावी. नाहीं तरी मग पुढें जें होईल तें पाहतच आहों. बहुत काय लिहिणें. लोभ असो दिजे. हे विनंति.