[६९]                                                                    ॥ श्रीशंकर ।।                                                    १२ जुलै १७५७

सेवेसी विज्ञापना बापूजी महादेव व *दामोदर महादेव वगैरे वकील यांचें पारपत्य करावें, जप्ती करावी, कां कीं ते हुजूर येत नाहींत व चाकरी यथास्थित करीत नाहींत ह्मणोन आज्ञा. ऐशीयासी, त्यांचें पारपत्य करणें अगाध नाहीं. एक हुजूर आले नाहीं हें तो खरेंच परंतु त्यासहि एक सबब होता. कोणता ह्मणावा ? धोंडीबा नाईक नवाळे यांजपासून मागील स्वारीमध्ये आह्मी कर्ज दहा लक्ष पर्यंत घेतले. त्यामध्ये त्यांणी परगणे तोडून दिले होते. त्याचा वसूल करून धोडिंबा नाईक यास देणें ह्मणोन त्यास चाकरीच सांगितली होती. ते वसूल करीत होते. मध्यें वजिरांनी लबाडी करून थोडे बहुत रुपये परगण्यापैकी घेतले. याजमुळें त्या बखेड्यांत वगैर बखेड्यांत होते. सारांश लबाड तर आहेतच, परंतु फार हरामखोरी केवळ आंगीं लावीन ह्मटल्यास नाहीं. स्वामीनी लिहिले की मल्हारबास पुरतें हातीं घेऊन मग पारपत्य करावें. दामोदर व पुरुषोत्तम यांची जप्ती करावी व त्यांस दुर केलें अशी शौरत करावी ह्मणजे हलके पडतील ह्मणोन आज्ञा. तरी इतकें काही संकट नाहीं. मल्हारबाचा त्याचा पेंचच आहे. दिल्लीहून आणीन ह्मटल्यासहि शंभर राऊत धरून आणतील. तेथे काहीं विशेष नाही. सांप्रत दामोदर तर वारले. बापू व दामोदर येथें आणून स्वामींकडे पाठवूं इतका अगाध त्याचा मजकूर काय आहे? परंतु केवळ बेअबरू करावे इतका अन्याय नाहीं. थोडे बहुत अन्याय, तरी बहुतच आहेत, त्याप्रमाणें पारपत्य करावेंच लागेल. स्वामी करतीलच. बहुत काय लिहिणें. हे विज्ञापना.
पै॥ छ २४ जिलकाद. श्रावण वद्य एकादशी.