[७०] ॥ श्रीशंकर ।। १२ जुलै १७५७
सेवेसी विज्ञापना. यंदा फौज चैत्र वैशाखांत आली व अबदाली चैत्रपर्यंत मथुरेवर होता. याजमुळें आह्मास एखादा मनसुंबा१५९ करावयास न फावलें. फावलें अंतर्वेद वगैरे अंमल उठला होता, याजमुळें सखारामपंताबराबर पांच हजार फौज देऊन सखाराम व विठ्ठलपंत व गंगोबा ऐसे वीस हजार फौज अंताजी देखील अतर्वेदींत पाठवून बंदोबस्त केला. वैशाख व ज्येष्ठ दोन महिने आह्मास रिकामे सांपडले. त्यामध्ये पहिली गडबड जाहाली होती ते वारली, व जेपूरचे अकरा लक्ष घेतले. त्यांपैकीं साहा तुर्त व पांचाचा ओला आहेत. ऐवज येईल तेव्हा प्रमाण ह्मणावा याप्रमाणें जाहलें. सारांश, आह्मांस रुपयांची ओढ भारी आहे, यास्तव स्वामींनीं ऐवज देववावा. असो, स्वामींसहि ओढ असेल, कर्ज करीत असतील; याजमुळें आह्मींहि कळेल तसें चालवूं. परंतु, कडाकुरा येथील तरी ऐवज गोविंद बल्लाळ व गोपाळराव गणेश यांजपासून रसद देववावी. हिकडे महागाई फार, याजमुळें लोकही कर्जदार झाले आहेत; यास्तव जरूर जाणोन लिहिलें असे. तरी या प्रमाणें करावे. येविसी अलाहिदा पत्रेंहि पाठविलीं आहेत. गोविंदपंतापासून कदाचित स्वामींनीं रसद घेतली असली तरी मोबदला ऐवज त्याजपासून आह्मास देववावा. दहा लक्ष दोघांकडील होतील. याखेरीज मग जसें बनेल तसें करतों. स्वामीपावेतों स्वामींचे दयेनें फौजेचा बोभाट१६० येणार नाहीं. यंदा दिवसगतीमुळें ऐवज वसूल न जाहाला; सबब लिहिलें असे इटावें, फफुंदेचा ऐवज अंताजीस देववावा लागेल. सर्व स्वामींत कळावें ह्यणोन लिहिले असे. बहुत काय लिहिणे. जुने महाल अंतर्वेद वगैरे आहेत. त्याची रसद आह्मी घेत नाहीं. जरूर जाणोन लिहिलें असे. बहुत काय लिहिणें हे विज्ञापना.
पै॥ छ २४ जिल्काद, श्रावण वद्य ११.