[२५] पै ।। छ २७ र।।खर ।। श्री ।। २० फेब्रुवारी १७५४
पु ।। श्रीमंत राजश्री पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-
कृतानेक विज्ञापना. मिरजाअबदलाबेग व यादगारबेग व ईनायदुलाबेग हे तिघे भाऊ शिकंदर७९ पातशहाचे घराणेयाचे सीपाही चांगले व खुदातरसी फकीरी तौरानें राहतात. रामदासपंताचे हंगामेयांत मोगलाचे लष्करांत सेवकास भेटले होते. कितेक भविष्याच्या गोष्टी सेवकाजवळोन हुजूर लेहविल्या होत्या. त्याप्रमाणें घडोनहि आलें. सांप्रत छ ९ रबिलाखरीं मिरजा अबदलाबेग सेवकास भेटले. बोलत होते कीं आपला धाकटा भाऊ यादगारवेग रावसाहेबांचे बांदगीस गेला आहे. त्यास जाऊन दोन महिने जाले. आपण दोघे भाऊ ये जागा आहों. मोगल लोक आह्मास चाहत नाहीं व आह्मीहि त्यांची परवा धरीत नाहीं. तूर्त मोंगलांचे दौलतेची अखेरी आली. रावसाहेबांचे ताले बुलंद. दीनबदीन दौलतेची तरकी आहे. याजबदल पांच वख्त उजू नमाज करून ईलाहीनजीक रावसाहेबांचे हक्कामध्यें दुवायाद करीत आहों. प्रस्तुत आह्मास बशारत जाली आहे कीं लढाईमध्यें तमाम मोगल मारले गेले. सलाबतजंगास कबरेमध्यें गाडावयास नेलें. शहानवाजखानास जखमा लागल्या. बहुत जेर जाले. तोंडांत पाणी घालितात. मुसाबुसीचें शीर कापिलें. लष्कर गारत जालें. रावसाहेबांचें झेंडे औरंगाबादेंत दाखल जाले. अवरंगाबादचें अलम तमाम हवेलीधाबेयावर चढून तमाशा पाहते. मोगलाई बुडोन राहिली. अत:पर फते रावसाहेबांची आहे. आजच मोगलाचा कुच जाला. अंधी आली. बाद केलें. दीन गाईब जाला. बावजबुन सुटला. गरद बहुत उठला. याचा विचार हाच कीं प्रस्तुत मोगल निघाले आहेत हे जिवंत नाहीं; मुर्दे जात आहेत. बारा कोसहि निभत नाहीं. आपआपल्यांत कटोन मरतील. निजामअल्ली व सलाबतजंग या दोघांतून येक जण पळोन रावसाहेबांचे आसरेयांत जाईल. यामध्यें खता नाहीं. आतां रावसाहेबीं ढील न करावी. दक्षणेचा* बंदोबस्त करावा. आमचे दिलांत रावसाहेबांचें कदम पहावयाची उमेद बहुत आहे. लेकिन बेसरंजाम आहों. मेहेरबान होऊन थोडाबहुत सरंजाम फर्मावितील तर जाऊन मुलाजमत करूं ह्मणोन बोलिले. हें वर्तमान हुजूर विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. याचा विचार पाहतां मिरजाअबदला बहुत थोर आहे. शिकंदरचे घराणेयाचा खरा. मनसुबेबाज, चतुर आहे. हुजूर दृष्टीस पडिलिया ध्यानास येईल. कृपाळू होऊन आज्ञा केली तर हुजूर येईल. बेखर्ची आहे. माणूस माकुल दिसतो. सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. सेवेसी श्रृत होय हे विज्ञापना.