वडीलपणें मजला कितेक बुद्धिवाद लिहिला व सर्फराजीचीं अक्षरें लिहिलीं. त्याजवरून फारच संतोष जाहला. बुद्धि शिकवणें व सर्फराज करणें हें वडिलांस उचितच असे त्याप्रें॥ वडील करतील हा भरंसा आहे. विशेष काय लिहू हे विनंति. माझे बुद्धीप्रें।। मी सरकारचें काम करीतच आहे. हे विनंति.

तीर्थस्वरूप पंत जिवंत असतां छ २४ जमादिलाखरी हुजुर विनंतिपत्रेंसात बंद विस्तारें लिहिले त्याचे हर जबाब कुल चिरंजीव राजश्री नारायणराव आप्पाजी याचे नांवे सादर जाले व माझे नांवे दोन वेळां दोन आज्ञापत्रें मुत्खसर सादर जालींत. आशास सांप्रत त्यांचीं उत्तरें येथून विनंतिपत्रें पाठविलीं असत त्याजवरून कळों येईल. घराऊ कामकाजाचा मजकूर लिहिला त्यासी तीर्थस्वरूप पंताचे दस्तकिती व यादी मजला ठाऊक नाही. व दस्तकींत यादींहि नाही. नवाब समसामुद्दोलासी अलीकडे पंतांनीं कांहीं मजकूरहि नवा केला नाही. रा॥ मुरारपंतनाना यांशी कागद आहेत. ते मजलाहि कळलेच आहेत. वडाळें व पिंपळगावचे वगैरे आहेत. त्याच्या सनदा लवकरच तयार करवितों. वडील आपले ताल्यानें राजे जालेत. ज्याचे ताले शिंकंदर त्याचे मनोरथ श्री पुरवीतच आहे. नवाब समासामुद्दोलास अर्जी पाठविली ते गुजराणून जवाब हसल करून पाठविला असे. इतक्यावर वडीलाचें पत्र त्यास हिंद्वीच येत जावें. चिंता नाहीं येथून जबाब फारशी होत जाईल रा॥ वेंकाजी हरी यासी खंडाळें खानापूर येथील काम करून दिल्हे. तीन चार हजार रुपये पेशगी द्यावी लागते. त्याचा सरंजाम दोचो दिवसांत होणार ह्मणजे खलत व सनद देऊन मार्गस्त केलें जाईल. रा॥ मालोजी राजे घोरपडे यांचे कार्याविशी फारसें लिहिले. अशास येथील प्रसंग सांप्रत काळचा कळतच आहे. आह्मी *सई करावयास चुकत नाहीं. रा॥ धोंडो आकदेव याचे पत्राचा जबाब व तीर्थस्वरूप पंताचे लिहिल्याप्रें॥ नांवें सनद पाठवून देऊं ह्मणोन लिहिलें तें कळलें. कासदास इनामवायदा चुकला तरी देणें ह्मणोन लिहिलें. अशास, त्याचा वायदा तरी बावीसावे शाबानीं त्यांनीं पावावें तें छ १ रमजानीं पावलें; परंतु वडिलांची आज्ञा प्रमाण यास्तव इनाम देऊनच मार्गस्त केलेत. श्रीमंत कृष्णा उतरल्यावर तुह्यांस हुजूर बोलावणार ह्मणोन लिहिलें. त्यासी उत्तम असे. आज्ञापत्र येताच हजूर येतो; परंतु गंगाजान्हवी मातुश्री बयाबाईचा हेतू जे चिरंजीव नारायणरायास घेऊन श्रीमतांपाशीं यावें. आपलें वर्तमान विनंति करावी. पुढें ज्याप्रें।। आज्ञा होईल त्याप्रें।। वर्तणूक करावी. तरी याचे उत्तर पाठविले पाहिजे. हे विनंति र॥ छ १४ रमजान.